पथ निहारते नयन,
गिनते दिन पल छिन,
लौट कभी आयेगा,
मन का जो मीत गया,
एक बरस बीत गया..
या ओळी आहेत कवी अटलबिहारी वाजपेयी यांच्या. भारताचे माजी पंतप्रधान. जनसंघ ते भाजपच्या उभारणीतील एक अग्रणी व्यक्तिमत्त्व बुधवारी ८९ वर्षांचे झाले. दिग्गज नेत्यांनी त्यांना शुभेच्छा दिल्या. कुठे सुंदरकांड तर कुठे गीत-गझल गायनाचा कार्यक्रम. वाजपेयी यांना सक्रिय राजकारणातून निवृत्त होऊन सातेक र्वष झालीत. प्रकृती अस्वास्थ्यामुळे ते कुणालाही भेटत नाही. प्रकृती अस्वास्थ्य इतके की; व्हीव्हीआयपी भेटायला आले तरी एकतर्फी संवाद. तरीही अटलबिहारी वाजपेयी यांच्या नेतृत्वाची मोहिनी कायम आहे.
वाजपेयींना शुभेच्छा देण्यासाठी त्यांच्या ‘६ ए कृष्ण मेनन’ मार्गावर पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंह साडेबारा वाजता दाखल झालेत. वीस मिनिटे थांबलेत. त्यांच्यापाठोपाठ ज्येष्ठ नेते लालकृष्ण अडवाणी. याशिवाय भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष राजनाथसिंह, पंतप्रधानपदाचे उमेदवार नरेंद्र मोदी, मध्य प्रदेशचे शिवराजसिंह चौहान, राजस्थानच्या मुख्यमंत्री वसुंधरा राजे, माजी अध्यक्ष नितीन गडकरी, लोकसभेतील विरोधी पक्षनेत्या सुषमा स्वराज आदी भाजप नेत्यांची वाजपेयींच्या घरी रीघ लागली होती. वाजपेयींना सर्व जण भेटत होते; पण वाजपेयी कुणालाही भेटत नव्हते. प्रकृती अस्वास्थामुळे वाजपेयी सार्वजनिक कार्यक्रम, भेटीगाठी घेत नाहीत. पण आज त्यांच्या निवासस्थानासमोर त्यांचे शेकडो चाहते जमले होते. कुणी पुष्पगुच्छ आणले होते तर कुणी हातात पोस्टर. ‘अब की बारी,..’अशी घोषणाही अधून-मधून घुमत होती. भाजप मुख्यालयाबाहेर पोस्टर्सची रांग होती. वृत्तपत्रांमध्ये गुजरात सरकारची पानभर तर मध्य प्रदेश सरकारची अर्धा पान जाहिरात होती. वाजपेयी दीर्घायू होण्यासाठी राजनाथ सिंह यांनी भाजप मुख्यालयात स्वाक्षरी अभियान सुरू केले. ११ अशोका रस्त्यावर ‘सुंदरकांडा’वर प्रवचन सुरू झाले होते. कुणी तरी म्हणालं, शनीची साडेसाती असली की सुंदरकांड लाभदायी असते. त्यावर, भाजपच्या नि नरेंद्र मोदींच्या राशीला सध्या शनीची साडेसाती सुरू असल्याची माहिती एका ज्योतिष्याने दिली़
नितीश कुमार यांची खंत
बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार यांनी वाजपेयी यांना शुभेच्छा दिल्या. आघाडी सरकार चालविण्यासाठी वाजपेयी यांनी काही नैतिक तत्त्वे पाळली होती. तेव्हा मी त्यांच्या नेतृत्वाखालील सरकारमध्ये कार्यरत होतो. भाजपचे सध्याचे नेते त्या तत्त्वांपासून दुरावल्यानेच भाजप आणि संयुक्त जनता दलातही दुरावा आला आहे, अशी खंतही कुमार यांनी व्यक्त केली़