काँग्रेसचे माजी अध्यक्ष राहुल गांधी यांनी केंब्रिज विद्यापीठात केलेल्या संबोधनात पंतप्रधान नरेंद्र मोदींवर टीका केली. त्याच प्रमाणे त्यांनी चीनचं तोंडभरून कौतुक केलं. आपल्या भाषणात राहुल गांधी यांनी पेगासॅसचाही उल्लेख केला. यानंतर आता भाजपाकडून तिखट प्रतिक्रिया समोर येत आहेत. राहुल गांधी यांनी आपल्या देशाचा अपमान केल्याचं केंद्रीय मंत्री अनुराग ठाकूर यांनी म्हटलं आहे.
राहुल गांधी यांनी काय म्हटलं होतं?
राहुल गांधी यांनी आपल्या भाषणात असं म्हटलं होतं की भारतात लोकशाही धोक्यात आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी हे लोकशाहीची पाया नष्ट करत आहेत. आम्ही लोकशाही वातावरण निर्माण करण्यासाठी एका नव्या विचाराचं आवाहन केलं आहे. मात्र नरेंद्र मोदी हे त्यांचाच एक अजेंडा संपूर्ण देशावर थोपवू पाहात आहेत. असं राहुल गांधी यांनी म्हटलं होतं.
एवढंच नाही तर राहुल गांधी पुढे हेदेखील म्हणाले की पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या विरोधात बोललं की थेट तुरुंगात टाकलं जातं. माझ्या विरोधातही काही खोटी प्रकरणं दाखल करण्यात आली. जी प्रकरणं दाखल करण्यात आली ते गुन्हे गंभीर नाहीत, अनेक गुन्हे खोटे आहेत तरीही माझ्यावर ते दाखल करण्यात आले. देशात आणि राज्याराज्यांमध्ये दबावतंत्र वापरलं जातं आहे असंही राहुल गांधी यांनी म्हटलं आहे. राहुल गांधी यांनी केंब्रिज विद्यापीठात केलेल्या या भाषणानंतर आता भाजपाने त्यांच्यावर टीकेचे बाण चालवले आहेत. तसंच पेगासॅस अंतर्गत माझाही फोन टॅप केला गेला होता. हेरगिरी केली गेली असंही राहुल गांधींनी म्हटलं होतं त्याचाही समाचार भाजपाने घेतला आहे.
भाजपाचे प्रवक्ते टॉम वडक्कन काय म्हणाले?
राहुल गांधी यांची बुद्धी भ्रष्ट झाली आहे. ते केंब्रिज विद्यापीठात चीनचं कौतुक करत होते. चीन आणि त्यांच्यात काय करार झाला आहे ते त्यांनी सांगितलं तर त्यांच्या वक्तव्याचा अर्थ समजू शकेल. भारतातल्या लोकांनाही काय डील झालं आहे ते समजेल.
केंद्रीय मंत्री अनुराग ठाकूर यांनी काय म्हटलं आहे?
राहुल गांधी निवडणुकीत आमच्याशी जिंकू शकले नाहीत. त्यामुळे आता विदेशात जाऊन भारताच्या विरोधात बोलत आहेत. भारताची प्रतिमा मलीन करण्याचं काम राहुल गांधी करत आहेत. पेगासॅस प्रकरणाची चौकशी सुप्रीम कोर्टाच्या समितीकडून केली जाते आहे. त्यावेळी राहुल गांधी आणि इतर काँग्रेस नेत्यांनी या समितीला फोन सुपूर्द का केले नाहीत? राहुल गांधी यांच्या फोनमध्ये असं काय आहे जे त्यांना लपवावं लागतं आहे? असा प्रश्न अनुराग ठाकूर यांनी विचारला आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदींवर केलेल्या टीकेलाही उत्तर
पंतप्रधान नरेंद्र मोदी लोकशाहीचा पायाच नष्ट करत आहेत या राहुल गांधींच्या आरोपावरही अनुराग ठाकूर यांनी उत्तर दिलं. राहुल गांधी हे वारंवार खोटं बोलत आहेत. खोटं बोल पण रेटून बोल हे त्यांचं धोरण आहे. राहुल गांधी यांना पंतप्रधान नरेंद्र मोदींबाबत तिरस्कार असू शकतो पण ते देशाची बदनामी का करत आहेत असा प्रश्न अनुराग ठाकूर यांनी विचारला आहे.