२०२४ मध्ये देशात लोकसभा निवडणूक पार पडणार आहे. अशात मुस्लिम मतदार हा आपल्या बाजूने यावा, त्या वर्गाची मतं आपल्याला मिळावीत यासाठी भाजपाने जोरदार तयारी सुरु केली आहे. भाजपाच्या अल्पसंख्याक विभागाने मुस्लिम मतदारांपर्यंत पक्ष पोहचवण्यासाठी सूफी संवाद महाअधिवेशन करण्याची तयारी सुरू केली आहे. ही मोहीम संपूर्ण देशभरात राबवली जाणार आहे. या मोहिमेच्या अंतर्गत भाजपातले मुस्लिम नेते, केंद्रीय मंत्री, राज्य मंत्री हे विविध दर्ग्यांना भेटी देऊन कव्वाली ऐकणार आहेत. कव्वालीच्या माध्यमातून पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि भाजपाचा प्रचार केला जाणार आहे.
भाजपाचा मुस्लिम समुदायाशी सूफी संवाद
सूफी दर्ग्यांवर जाणाऱ्या मुस्लिम बांधवांना कव्वालीच्या माध्यमातून हे सांगितलं जाईल की भाजपा सरकार कोणत्याही योजनांसाठी कसा भेदभाव करत नाही. मुस्लिम समुदायाला कशा पद्धतीने सरकारच्या सगळ्या योजनांचा लाभ दिला जातो आहे. या मोहिमेची सुरूवात उत्तर प्रदेशातून केली जाणार आहे. उत्तर प्रदेशातल्या प्रमुख शहरांमध्ये असलेल्या दर्ग्यांमध्ये कव्वालीचं आयोजन केलं जाईल. या प्रकारचा प्रयोग भाजपाकडून केला जाण्याची ही पहिलीच वेळ असावी. भाजपा या मोहिमेतून हा संदेश देऊ इच्छिते की मुस्लिम मतं ही आमच्यासाठी महत्वाची आहेत.
कर्नाटकचे शाह रशीद अहमद यांना पद्मश्री
कर्नाटकचे बिदरी कलाकार शाह रशीद अहमद कादरी यांना ५ एप्रिल रोजी पद्मश्री पुरस्कार देऊन गौरवण्यात आलं. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या हस्ते हा पुरस्कार मिळाल्यानंतर कादरी यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींची भेट घेतली. कादरी यांनी यानंतर असं म्हटलं होतं की, “भाजपा सरकारकडून मला कधीही हा पुरस्कार मिळणार नाही. मला वाटत होतं की युपीएच्या कार्यकाळात मला हा पुरस्कार मिळेल. मात्र तेव्हा मिळाला नाही. २०१४ पासून देशात भाजपाचं सरकार आहे. त्यावेळी मला वाटलं होतं की हा पुरस्कार मला मिळणार नाही. मात्र तुम्ही मला चुकीचं सिद्ध केलंत” असं कादरी यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींना सांगितलं. आज तकने या संदर्भातलं वृत्त दिलं आहे.
उत्तर प्रदेशातल्या मदरशांमध्ये वाटल्या जाणार मन की बातच्या उर्दू प्रति
भाजपाने उत्तर प्रदेशातल्या मदरशांमध्ये मन की बातच्या उर्दू प्रति वाटण्याचाही निर्णय घेतला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि इस्लामच्या विद्वानांशी झालेली चर्चा याचा उर्दू अनुवाद करून त्या प्रतिही मदरशांमध्ये वाटल्या जाणार आहेत. एवढंच नाही तर उत्तर प्रदेश भाजपा अल्पसंख्याक मोर्चाचे कुँवर बासित अली यांनी मन की बात या मोदींच्या १२ रेडिओ संवादांचं भाषांतर उर्दू भाषेत करून त्याचं एक पुस्तक लिहिलं आहे. हे पुस्तकही मुस्लिम समुदायासाठी प्रकाशित केलं जाईल, त्यांना वाटलं जाईल.