तिरूअनंतपुरम : केरळमधील शबरीमला मंदिरात सर्व वयोगटाच्या महिलांना प्रवेश देण्याबाबत सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या निकालाच्या विरोधात भाजपने काढलेला मोर्चा सोमवारी येथील सचिवालयावर धडकला.

दुसऱ्या एका घडामोडीत त्रावणकोर देवासम मंडळाने या प्रकरणाशी संबधितांची बैठक उद्या बोलावली असून  त्यात प्रमुख धर्मगुरू म्हणजे तांत्री, पंडालम राज घराणे, अय्यपाप सेवा संगम यांचा समावेश असणार आहे.

१७ नोव्हेंबरपासून मंडलम मकारविलाकू यात्रा पर्व सुरू होत असून त्याच्या तयारीवर तसेच सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या निर्णयावर या बैठकीत चर्चा होण्याची शक्यता आहे. मासिक धार्मिक विधीसाठी मंदिर बुधवारी पुन्हा उघडले जाणार आहे.

भाजप कार्यकर्त्यांनी  काढलेल्या मोर्चात महिला व मुले मोठय़ा संख्येने सामील होती. अय्यपाचा मंत्रघोष करीत हा मोर्चा काढण्यात आला, त्यात अय्यपाच्या चित्रांना हार घालण्यात आला.

डाव्या आघाडी सरकारने न्यायालयाच्या निर्णयाची अंमलबजावणी सुरू क रण्याचा निर्णय घेतल्याने त्याविरोधात निषेध करण्यासाठी गेल्या आठवडय़ात पंडालम येथून हा महामोर्चा निघाला असून तो सोमवारी सचिवालयावर धडकला. भाजपने असा आरोप केला आहे की, न्यायालयाच्या निकालाची अंमलबजावणी करण्यात कटाचा भाग आहे.

अय्यपा मंदिरात लाखो लोक तीन महिन्याच्या यात्रेत दर्शनासाठी येत असतात.  एनडीएचे नेते सुरेश गोपी, भारतीय धर्मसेनेचे प्रमुख तुषार वेलापल्ली हे या मोर्चात आघाडीवर असून भाजपचे प्रदेशाध्यक्ष पी.ए, श्रीधरन पिल्ले यांनी त्याचे नेतृत्व केले. पिल्ले यांनी सांगितले की, सरकारने हा प्रश्न सोडवला नाही तर भाजप-एनडीएचे आंदोलन वेगळे वळण घेईल.

आम्ही केरळातील प्रत्येक ग्रामस्थाची भेट घेऊन शबरीमला मंदिराच्या संरक्षणासाठी लढा उभा करू. माकप प्रणीत डाव्या लोकशाही आघाडी सरकारने २४ तासात तोडगा काढला नाही तर महाआंदोलन सुरू केले जाईल. शबरीमला मंदिर १७ ऑक्टोबरला सायंकाळी खुले होणार असून २२ ऑक्टोबरला बंद होणार आहे. त्या पाच दिवसात थुलम या महिन्यातील पूजा केली जाईल. आंदोलनामुळे राजधानीत कडक बंदोबस्त ठेवण्यात आला होता. हिंदू संघटना व गटांनी शबरीमला निकालाविरोधात आंदोलने सुरू केली असून मंदिरातील विधींचे पावित्र्य जपावे अशी मागणी केली आहे. २८ सप्टेंबरला सर्वोच्च न्यायालयाने सर्व वयोगटातील महिलांना शबरीमला मंदिरात प्रवेश देण्याचा आदेश दिला होता.

Story img Loader