राजस्थानमधील आपल्या काँग्रेस पक्षासाठी केलेल्या प्रचाराच्या भाषणात मतांसाठी विविध धर्मामध्ये तेढ निर्माण करणारे वक्तव्य करून राहुल गांधी यांनी निवडणुकीच्या आचारसंहितेचा भंग केला आहे, अशी तक्रार भारतीय जनता पक्षातर्फे केंद्रीय निवडणूक आयोगाकडे करण्यात आली आहे. भाजपच्या उच्चस्तरीय शिष्टमंडळाने मुख्य निवडणूक आयुक्त व्ही. एस. संपथ यांच्याकडे आपला सहा पानी तक्रार अर्ज दाखल केला.
‘काँग्रेसची राष्ट्रीय पक्ष म्हणून असलेली मान्यता आयोगाने रद्द करावी तसेच काँग्रेस पक्षाच्या उपाध्यक्षांविरोधात आचारसंहितेचा भंग केल्याप्रकरणी कारवाई करण्यात यावी, अशी मागणी भाजपने केली आहे. काँग्रेस हा आचारसंहितेचा सातत्याने भंग करणारा पक्ष असल्याचा आरोपही भाजप उपाध्यक्ष मुख्तार अब्बास नक्वी यांनी केला आहे. आपल्या भाषणात राहुल यांनी हिंदू-शीख आणि हिंदू-मुस्लिम यांच्यात तेढ निर्माण करणारी वक्तव्ये केली होती. या विरोधात प्राथमिक माहिती अहवाल दाखल करण्यात यावा, अशी विनंतीही या अर्जात करण्यात आली आहे.
राहुलचे वक्तव्य कोणत्या अधिकारात?