दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी गेल्या काही दिवसांपासून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या पदवीबद्दल उपस्थित केलेल्या प्रश्नांना सोमवारी भाजपकडून सडेतोड उत्तर देण्यात आले. मोदी यांचे पदवी आणि पदव्युत्तर पदवी प्रमाणपत्र भाजपकडून सार्वजनिक करण्यात आले. दिल्लीत पत्रकार परिषदेत भाजप अध्यक्ष अमित शहा यांनी केजरीवालांनी आता देशाची आणि जगाची माफी मागितली पाहिजे, अशी मागणी केली.
अमित शहा म्हणाले, नरेंद्र मोदी यांनी दिल्ली विद्यापीठातून कला शाखेची पदवी तर गुजरात विद्यापीठातून राज्यशास्त्रामध्ये पदव्युत्तर पदवी प्राप्त केली आहे. या दोन्ही प्रमाणपत्रांच्या प्रती पक्षाकडून सार्वजनिक करण्यात आल्या आहेत. देशाच्या पंतप्रधानांच्या पदवीबद्दल शंका उपस्थित करून सार्वजनिक जीवनातील टीकेचा स्तर किती खालावला आहे, हे केजरीवाल यांनी दाखवून दिले. जागतिक पातळीवर देशाला बदनाम करण्याचे पाप त्यांनी केले आहे. कोणताही पुरावा नसताना केवळ चुकीच्या माहितीच्या आधारावर त्यांनी पंतप्रधानांच्या पदवीबद्दल प्रश्न उपस्थित केले. माध्यमांची दिशाभूल केली. आता त्यांनी देशाची आणि जगाची माफी मागितली पाहिजे. तसेच आपण चुकीचे प्रश्न का उपस्थित केले, याचा खुलासाही केला पाहिजे. पंतप्रधानांच्या पदवीबद्दल माहिती देण्यासाठी आम्हाला पत्रकार परिषद घ्यावी लागते, याबद्दलही आम्हाला खूप वाईट वाटते, असेही शहा म्हणाले.
यावेळी अरूण जेटली म्हणाले, पदवीची खोटी प्रमाणपत्र दिल्याबद्दल आम आदमी पक्षातील सर्वाधिक सदस्यांवर गुन्हे दाखल आहेत. त्यांनीच पंतप्रधानांच्या पदवीबद्दल शंका उपस्थित करणे अत्यंत चुकीचे आहे.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा