BJP Mayor fakes blood donation: उत्तर प्रदेशच्या मुरादाबादचे महापौर आणि भाजपाचे ज्येष्ठ नेते विनोद अग्रवाल यांना सध्या सोशल मीडियावर ट्रोल करण्यात येत आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या वाढदिवसानिमित्त (१७ सप्टेंबर) भाजपाच्या वतीने रक्तदान शिबिर आयोजित करण्यात आले होते. भाजपा कार्यालयात आयोजित केलेल्या या शिबिराला विनोद अग्रवाल यांनी भेट दिली. यावेळी त्यांनी रक्तदान करतानाचा एक व्हिडीओ चित्रित केला. मात्र प्रत्यक्षात त्यांनी रक्तदान केलेच नव्हते. तसेच रक्त घेण्यासाठी उपस्थित असलेल्या आरोग्य कर्मचाऱ्यानेही बोगस रक्तदान कळू नये यासाठी धडपड केल्याचे व्हिडीओत दिसले. हा व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर आता अग्रवाल यांना ट्रोलिंगला सामोरे जावे लागत आहे.

व्हिडीओमध्ये दिसत आहे की, विनोद अग्रवाल रक्तदान करण्यासाठी बेडवर झोपले आहेत. आरोग्य कर्मचारी त्यांची रक्तदाब चाचणी करत आहे. यावेळी विनोद अग्रवाल सांगतात की, यापुढची प्रक्रिया (रक्तदान) करू नका आणि ते थट्टा मस्कर करताना दिसतात. त्यानंतर त्यांच्या हाताला वरचेवर चिकटवलेली सुई आरोग्य कर्मचारी काढून घेतो.

सोशल मीडियावर खालील व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर फक्त कॅमेऱ्यात दिसण्यासाठी महापौरांनी बेडवर झोपून रक्तदान करत असल्याचा आभास निर्माण केला, याबद्दल जोरदार टीका केली.

व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर विनोद अग्रवाल यांनी मात्र यासाठी विरोधकांना जबाबदार धरले. मला बदनाम करण्यासाठी व्हिडीओ व्हायरल केला गेला, असा आरोप त्यांनी केला. ते म्हणाले की, मी रक्तदान करण्यासाठीच तिथे गेलो होतो. मात्र मला मधुमेह असल्याकारणाने डॉक्टरांनीच मला रक्तदान न करण्याचा सल्ला दिला.

महापौर विनोद अग्रवाल काय म्हणाले?

महापौर विनोद अग्रवाल म्हणाले, “१७ सप्टेंबर रोजी भाजपाच्या युवक संघटनेने रक्तदान शिबिर आयोजित केले होते. मलाही रक्तदान करण्याची इच्छा होती. रक्तदान करण्यापूर्वी डॉक्टरांनी मला मधुमेह आहे का? असे विचारले. मी त्यांना म्हणालो, दोन वर्षांपूर्वीच मधुमेहाचे निदान झाले आहे. तसेच मला हृदयाशी संबंधित विकार आहे. त्यामुळे डॉक्टरांनी मला रक्तदान करण्यास मनाई केली आणि मग मी बेडवरून उठलो.”