पुढील वर्षी होऊ घातलेल्या लोकसभा निवडणुका अवघ्या काही महिन्यांवर येऊन ठेपल्या आहेत. त्यामुळे राष्ट्रीय पातळीवर सर्व प्रमुख पक्ष व आघाड्या कामाला लागल्याचं पाहायला मिळत आहे. कार्यकर्ते-पदाधिकाऱ्यांच्या भेटीगाठी, बैठका, आघाडी किंवा युतीच्या चर्चा अशा सर्व वातावरणात एकमेकांवर आरोप-प्रत्यारोपांची कोणतीही संधी सत्ताधारी वा विरोधक सोडताना दिसत नाहीयेत. या पार्श्वभूमीवर बिहारमध्ये राजकीय घडामोडींना वेग आल्याचं दिसत आहे. लवकरच नेतृत्वबदल होणार असल्याचे सूतोवाच भाजपाच्या केंद्रीय मंत्र्यांनी केले आहेत.
बिहारमध्ये नितीश कुमार मुख्यमंत्रीपदी असून विरोधी पक्षांच्या इंडिया आघाडीमध्ये नितीश कुमार यांचं नाव पंतप्रधानपदाच्या शर्यतीत आघाडीवर घेतलं जात आहे. या पार्श्वभूमीवर गेल्या काही दिवसांपासून भाजपाकडून नितीश कुमार यांना सातत्याने लक्ष्य केलं जात असल्याचं दिसून येत आहे. नितीश कुमार यांच्यावर बिहारमधील भाजपा नेत्यांप्रमाणेच काही केंद्रीय नेत्यांनीही टीका-टिप्पणी केल्यानंतर आता केंद्रीय मंत्री गिरीराज सिंह यांनी नितीश कुमार व बिहारच्या राजकारणाबाबच मोठं विधान केलं आहे. त्यांच्या या विधानामुळे तर्क-वितर्कांना उधाण आलं आहे.
काय म्हणाले गिरीराज सिंह?
गिरीराज सिंह यांनी एएनआयशी बोलताना बिहारमधील घडामोडींबाबत प्रतिक्रिया दिली आहे. “नितीशकुमार आता काही दिवसांचेच पाहुणे आहेत. ते आता मुख्यमंत्रीपदी राहणार नाहीत. लालूप्रसाद यादव यांनी पूर्ण चक्रव्यूह रचलं आहे. त्या चक्रव्यूहाचा पहिला टप्पा होता अवधबिहारी यांना बिहार विधानसभेचे अध्यक्ष बनवणं. त्यांना ५ ते ६ आमदार कमी पडत आहेत. ते यायला तयार आहेत. नितीश कुमार तेजस्वी यादव यांना मुख्यमंत्री बनवत नाहीयेत. त्यामुळे आता लालू प्रसाद यादव यांनी चक्रव्यूह तयार केलं आहे”, असा दावा गिरीराज सिंह यांनी केला आहे.
“नितीश कुमार यांनी काहीही करू देत, पण…”
दरम्यान, नितीश कुमार यांनी काहीही केलं, तरी त्यांचं मुख्यमंत्रीपद जाणार असल्याचं भाकित गिरीराज सिंह यांनी वर्तवलं आहे. “आता नितीश कुमार फक्त काही दिवसांचेच पाहुणे आहेत. मग त्यांना जे करायचं असेल ते करू देत. लालू प्रसाद यादव आता त्यांना मुख्यमंत्रीपदी राहू देणार नाहीत. अजूनही त्यांनी जर तेजस्वी यादव यांचं मुख्यमंत्रीपद मान्य केलं तर यातून सुटका होऊ शकते. किंवा दुसरा मार्ग म्हणजे त्यांच्या पक्षात जदयूला विलीन केलं तरच काहीतरी होऊ शकतं. जर त्यांनी ऐकलं नाही, तर मात्र अवघड आहे”, असा मोठा दावा सिंह यांनी यावेळी केला.
“नितीश कुमार यांची राजकीय कारकिर्द संपेल की नाही हे मी सांगू शकत नाही. पण त्यांचं मुख्यमंत्रीपद जाणार हे नक्की आहे. ते महिन्याभरात होऊ शकतं, १० दिवसांत होऊ शकतं किंवा पाच दिवसांतही होऊ शकतं. पण येत्या काही दिवसांत बिहारमध्ये राजदचा मुख्यमंत्री असेल”, असंही ते म्हणाले.