संसदेला तोंड देण्याची हिंमत पंतप्रधान नरेंद्र मोदींमध्ये नाही अशी टीका रविवारी काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी यांनी केली. ही टीका भाजपच्या नेत्यांना चांगलीच झोंबल्याचे दिसते आहे. ‘काँग्रेसला संसदेबाबत वाटणारा आदर आणि संसदेबाबत वाटणारे प्रेम आश्चर्यकारक आहे’ असा खोचक टोला केंद्रीय मंत्री रविशंकर यांनी लगावला आहे. इतकेच नाही तर राहुल गांधीही अनेकदा संसदेत गैरहजर असतात. नोटाबंदी आणि जीएसटी याबाबत काँग्रेसकडून केंद्र सरकारवर कायमच टीका होत असते. मात्र या टीकेला काहीही अर्थ नाही असेही रविशंकर प्रसाद यांनी सुनावले आहे. ‘एएनआय’ या वृत्तसंस्थेने या संदर्भातले ट्विट केले आहे.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यात संसदेला सामोरे जाण्याची हिंमत नाही, म्हणूनच त्यांनी हिवाळी अधिवेशन लांबणीवर टाकले आहे. या सरकारला जनतेच्या प्रश्नांशी काहीही देणेघेणे नाही अशी टीका सोनिया गांधी यांनी रविवारी केली होती. मात्र भाजप नेत्यांनी यावर प्रतिक्रिया देत काँग्रेसला चांगलेच सुनावले आहेत. संसदेच्या दोन्ही सभागृहांमध्ये आपली कोंडी होते आहे असे वाटले की काँग्रेसचे लोक पळ काढतात आणि त्याला बहिष्कार असे सोयीस्कर नाव देतात. सरकारविरोधी भूमिका घेतात असेही रविशंकर प्रसाद यांनी म्हटले आहे.

याआधी केंद्रीय अर्थमंत्री अरूण जेटली यांनीही काँग्रेसकडे कोणताही मुद्दा नसल्याचे सांगत सोनिया गांधींच्या वक्तव्यावर टीका केली होती. गुजरात आणि हिमाचलच्या निवडणुका आहेत त्यामुळे हिवाळी अधिवेशन पुढे ढकलले आहे. याआधी काँग्रेसच्या काळातही अधिवेशन पुढे ढकलण्यात आले आहे असेही जेटली यांनी म्हटले. आता रविशंकर प्रसाद यांनीही काँग्रेसला सुनावले आहे.

Story img Loader