उत्तर प्रदेशातील वाराणसी येथील ज्ञानवापी मशिदीवरून चांगलंच वातावरण तापलंय. मशिदीखाली सर्व्हेक्षणात शिवलिंग सापडल्याने देशभरात खळबळ उडाली आहे. या प्रकरणावर आज सुप्रीम कोर्टात सुनावणी होणार आहे. दरम्यान, यातच मध्य प्रदेशातील शिवराज सरकारमधील मंत्री उषा ठाकूर यांनी मुस्लिमांबाबत केलेले वक्तव्य सध्या चर्चेत आहे. उषा ठाकूर या मध्य प्रदेशचे मुख्यमंत्री शिवराज सिंह चौहान यांच्या मंत्रिमंडळात पर्यटन, संस्कृती आणि अध्यात्म मंत्री आहेत. हिंदूंनी मुस्लिमांचा आदर्श घ्यावा, असं ठाकूर यांनी म्हटलंय.
उषा ठाकूर मंगळवारी खंडवा जिल्ह्याच्या दौऱ्यावर होत्या. यावेळी त्यांनी संस्कारांच्या कट्टरतेवर भाष्य केले. त्या म्हणाल्या की, “मुस्लिमांना दिवसातून पाच वेळा नमाज अदा करण्यासाठी कोणी बोलवायला येतं का? तुम्ही या, असं सांगायला कोणी जातं का? नाही. तरी ठरलेल्या वेळी, मुस्लिम टोपी घेऊन नमाज अदा करण्यासाठी पोहोचतात. अधिकारी असो, व्यापारी असो किंवा अन्य कोणी. ते आपापली सर्व कामे सोडून नमाज अदा करण्यास पोहोचतात.”
उषा ठाकूर यांच्या या दौऱ्याचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. या दौऱ्यात त्या रात्री 10 वाजता गाय पूजनाच्या एका कार्यक्रमात सहभागी झाल्या होत्या. इथे त्या म्हणतात, “मुलांवर दृढ आणि कट्टरतेने धार्मिक संस्कार करणे ही पालकांची आणि कुटुंबाची जबाबदारी आहे. आणि जर तुम्हाला संस्कारांची कट्टरता शिकायची असेल तर मुस्लिमांना तुमचा आदर्श बनवा. नमाजासाठी निश्चित केलेल्या वेळेसाठी ते संसाराची सर्व कामे सोडून नमाज अदा करतात. मग ती लहान मुलं असो वा मोठी मुलं, मग तो अधिकारी असो वा व्यापारी, सर्वजण नमाजसाठी वेळेत पोहोचतात.”
पुढे त्या म्हणाल्या, “आम्हाला गावात मंदिर बांधण्याची आवड आहे, पण आरतीला जाण्यात रस नाही. मंत्री मुस्लिम त्यांच्या धर्म आणि संस्कारांबद्दल कट्टर आहेत. दुसरीकडे आम्ही कोणत्याही आरतीला जात नाही. चौकाचौकात बसून गप्पा मारणार, पण मंदिरात जाणार नाही. अरे भाऊ, हेच करायचं होतं, तर मंदिरं का बांधलीत?”, असा प्रश्न त्यांनी उपस्थित केला.