लखीमपूर खेरीमध्ये शेतकऱ्यांची गाडीखाली चिरडून हत्या झाल्यानंतर १० दिवसांनी भाजपाचे पहिले वरिष्ठ नेते आणि मंत्र्यांनी या भागाला भेट दिली आहे. मात्र, या भेटीत त्यांनी शेतकऱ्यांच्या पीडित कुटुंबांना भेटणं टाळलेलं दिसलं. ब्रजेश पाठक असं या भाजपा नेत्याचं नाव असून ते उत्तर प्रदेशचे कायदामंत्री आहेत. त्यांनी बुधवारी (13 ऑक्टोबर) केवळ शेतकऱ्यांना गाडीखाली चिरडल्यानंतर झालेल्या हिंसाचारात मृत्यू झालेल्या भाजपचे कार्यकर्ते शुभम मिश्रा आणि केंद्रीय गृहराज्यमंत्री अजय मिश्रा यांच्या चालकाच्या कुटुंबीयांची भेट घेतली.
शुभम मिश्रा यांनी लखीमपूर हिंसाचारात मृत्यू झालेल्या ४ जणांच्या कुटुंबीयांची भेट घेतली नाही. यात शेतकरी नछत्तर सिंग, लवप्रीत सिंग, गुरविंदर सिंग, दिलजीत सिंग, भाजपा कार्यकर्ता श्याम सुंदर निषाद आणि पत्रकार रमन कश्यप यांचा समावेश आहे. गुरविंदर आणि दिलजीत हे शेजारच्या बहरीच जिल्ह्यातील रहिवासी होते.
“परिस्थिती सामान्य झाल्यानंतर शेतकरी कुटुंबाना भेट देणार”
इंडियन एक्स्प्रेसने मंत्री ब्रजेश पाठक यांना या भेटीबाबत विचारलं असता ते म्हणाले, “भाजपा कार्यकर्ता निषाद आणि पत्रकार कश्यप घटना घडली तेथून जवळच राहत होते. त्यामुळे मी परिस्थिती सामान्य झाल्यावर त्यांच्या कुटुंबीयांना भेट देईल. याशिवाय वातावरण निवळल्यानंतर शेतकरी कुटुंबांसोबतही चर्चा केली जाईल.”
पीडित भाजपा कार्यकर्त्यांच्या कुटुंबीयांकडून शस्त्रपरवान्याची मागणी
“मी या भेटीत भाजपाचे कार्यकर्ते निषाद आणि चालकाच्या पीडित कुटुंबाला या प्रकरणात निष्पक्ष तपासाचं आश्वासन दिलं. तसेच जीवाला धोका असल्यानं त्यांनी शस्त्र परवान्याची मागणी केलीय. त्यांच्या या मागणी पूर्ण करण्यासाठी लक्ष घालू असं आश्वसन दिलं,” अशी माहिती पाठक यांनी दिली.
“भाजपाच्या मंत्र्यांनी पीडित कुटुंबाला भेटणं घाईचं होईल”
शेतकरी नेते आणि विरोधी पक्षांनी भाजपा नेत्यांच्या या भेटीवर सडकून टीका केलीय. ही भेट म्हणजे लोकांचं लक्ष्य विचलित करण्याचा प्रयत्न आहे, असं त्यांनी सांगितलं. शेतकरी नेते राकेश टीकैत म्हणाले, “भाजपाच्या मंत्र्यांनी पीडित कुटुंबाला भेटणं घाईचं होईल. ज्या घरातील शेतकऱ्यांची हत्या झालीय त्यांच्याकडून तीव्र प्रतिक्रिया येऊ शकते. त्यामुळे कुणालाही त्यांना भेटायला जायचं असेल तर आधी त्या कुटुंबाची परवानगी घेणं गरजेचं आहे.”
हेही वाचा : लखीमपूर खेरी इथली घटना म्हणजे जालियनवाला बाग हत्याकांड – शरद पवार
“सरकार गुन्हेगारांचं संरक्षण करतंय, पीडितांना न्याय देण्याचा कोणताही हेतू दिसत नाही”
उत्तर प्रदेश काँग्रेसचे अध्यक्ष अजय कुमार लल्लू म्हणाले, “सरकारकडून तपासाची दिशा भरकटवण्यासाठी ही भेट घेण्यात आलीय. हे सरकार गुन्हेगारांचं संरक्षण करत आहे. घटना घडल्यानंतर १० दिवसांनी भेट घेणं म्हणजे त्यांचा पीडितांना न्याय देण्याचा कोणताही हेतू दिसत नाही.” “विरोधी पक्षांच्या दबावानंतर घेतलेली ही भेट भाजपा नेत्यांची केवळ औपचारिकता आहे. सरकारला या घटनेवरून लक्ष्य हटवायचं आहे,” असा आरोप समाजवादी पक्षाचे प्रवक्ते राजेंद्र चौधरी यांनी केला.