देशात एकीकडे करोनाचा कहर वाढत असून दैनंदिन रुग्णसंख्या उच्चांक गाठत आहे. करोनाचा फैलाव ऱोखण्यासाठी देशात एकीकडे आरोग्य व्यवस्था दिवसरात्र मेहनत करत असताना राजकीय नेत्यांकडून वेगवेगळी वक्तव्यं केली जात आहेत. भाजपाचे बुलंदशहचे आमदार देवेंद्र सिंह लोधी यांनी गोमूत्र प्यायल्याने कॅन्सर आणि करोनासारखे आजार होणार नाहीत असा दावा केला आहे. गोमूत्र प्यायल्याने रोगप्रतिकारक शक्ती वाढते असं ते म्हणाले आहेत.

देवेंद्र सिंह यांच्या वक्तव्यावर काँग्रेस नेते राजीव शुक्ला यांनी टीका केली आहे. “हे सर्व अद्यापही सुरु आहे. कोर्टाने यांना शांत राहण्यास सांगितलं पाहिजे. अशा वक्तव्यांमुळे लोकांमधील रोष वाढतो. भाजपा आमदारांना अशा वक्तव्यांची सवय झाली आहे. कोणीही गोमूत्रच्या विरोधात नाही. पण डॉक्टर असल्याप्रमाणे करोनावरील इलाज सांगून गोमातेला यामध्ये आणू नये,” असं ते म्हणाले आहेत.

देवेंद्र सिंह लोधी यांनी रोज २५ एमएल गोमूत्र प्यायल्याने सर्व आजार पळून जातात असं म्हटलं आहे. तसंच लिव्हर, किडनी यांनाही खराब होऊ देत नाही असं म्हटलं आहे. लोधी यांनी याआधीही वादग्रस्त वक्तव्यं केली आहेत. उत्तराखंडचे भाजपा आमदार महेंद्र भट्ट यांनीदेखील उपाशी पोटी गोमूत्रचं सेवन केल्यास करोनाचा खात्मा होईल असा दावा केला होता.

Story img Loader