अमेरिकेतील ‘प्ले बॉय’ क्लबला राज्यात कोठेही आपली शाखा सुरू करण्यास परवानगी दिल्यास उपोषणाला बसण्याचा इशारा देऊन भाजपच्या आमदारानेच राज्य सरकारला घरचा आहेर दिला आहे.
पर्यटन विभाग अमेरिकेतील ‘प्ले बॉय’ क्लबला ना-हरकत प्रमाणपत्र देऊन राज्यात आपली शाखा सुरू करण्यासाठी परवानगी देण्याच्या विचारात आहे. हा क्लब माझ्याच मतदारसंघात सुरू करण्याचे घाटत आहे, मात्र केवळ माझ्याच मतदारसंघात नव्हे तर राज्यात कोठेही ‘प्ले बॉय’ क्लबची शाखा सुरू केली जाऊ नये, असे आपल्याला वाटते, असे भाजप आमदार मायकेल लोबो यांनी वार्ताहरांना सांगितले. लोबो हे उत्तर जिल्हा भाजपचे प्रमुख आहेत. अशा क्लबला आपली शाखा सुरू करण्यास परवानगी दिली जाणार नाही, असे आश्वासन मुख्यमंत्री पर्रिकर यांनी आपल्याला दिले असल्याचा दावाही त्यांनी केला.  
याअगोदर सोमवारी सकाळी राज्याचे पर्यटनमंत्री दिलीप परुळेकर यांनी विधानसभेत ‘प्ले बॉय’च्या भारतातील फ्रँचाइझीचा कण्डोलीम समुद्रकिनाऱ्यावर शाखा सुरू करण्याच्या प्रस्तावाचा राज्य सरकार विचार करीत आहे, असे सांगितले होते. मात्र त्यानंतर त्यांनी पत्रकारांशी बोलताना या क्लबमध्ये कोणतेही अश्लील प्रकार घडल्यास ते खपवून घेतले जाणार नाहीत, असेही स्पष्ट केले होते.

Story img Loader