राजस्थानमध्ये भाजपानं काँग्रेसचा धुव्वा उडवला आहे. विधानसभा निवडणुकीत भाजपाला मोठं यश मिळालं आहे. मतदानाचा निकाल समोर येऊन २४ तासंही झाले नाहीत, अशातच भाजपा आमदार अॅक्शन मोडवर आले आहेत. भाजपा आमदारानं रस्त्यावरही मांसाहारी पदार्थ विकणाऱ्या दुकानांवरून थेट अधिकाऱ्याला फोन करून तंबी दिली आहे.
बालमुकुंद आचार्य असं भाजपा आमदाराचं नावं आहे. बालमुकुंद आचार्य हवामहल मतदारसंघातून निवडून आले आहेत. आचार्य यांनी सरकारी अधिकाऱ्याला फोन करून रस्त्यावर कुणीही मांसाहार पदार्थ विकू नये, असा इशारा दिला आहे.
बालमुकुंद आचार्य फोन करून अधिकाऱ्याला म्हणाले, “रोडवरती मांसाहार विकू शकतो का? होय किंवा नाही बोला. तातडीने रस्त्यावरील मांसाहारी पदार्थ विकणारी सगळी दुकाने हटवून टाका. सायंकाळपर्यंत एकही दुकान दिसले नाहीत पाहिजे. याची माहिती मी तुमच्याकडून घेणार आहे. मग, कोण अधिकारी आहे, याच्याशी मला देणंघेणं नाही.”
६०० मतांनी जिंकली निवडणूक
जयपूरच्या हवामहल मतदारसंघातून बालमुकुंद आचार्य यांनी ६०० मतांनी निवडणूक जिंकली आहे. आचार्य यांनी काँग्रेसच्या आर.आर तिवारी यांचा पराभव केला आहे. तसेच, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी बालमुकुंद आचार्य यांचा प्रचार केला होता. बालमुकुंद आचार्य यांनीच एकनाथ शिंदेंचा बॅनरवर ‘हिंदू हृदयसम्राट’ उल्लेख केला होता.