Karnataka BJP MLA Munirathna Naidu: कर्नाटकमधील बंगळुरूच्या राजराजेश्वरी नगर विधानसभेचे भाजपाचे आमदार आणि माजी मंत्री एन. मुनिरत्न नायडू यांना बलात्कार प्रकरणात नुकताच जामीन मिळाला आहे. त्यानंतर मतदारसंघात एका कार्यक्रमाला उपस्थित राहण्यासाठी पोहोचले असताना त्यांच्या डोक्यावर काही जणांनी अंडी फेकली. या घटनेचा व्हिडीओ सध्या व्हायरल होत आहे. कार्यक्रम आटोपून आपल्या वाहनाकडे जात असताना मुनिरत्न यांच्यावर अंडी फेकण्यात आले. यावेळी त्यांच्या सुरक्षा रक्षकांनी मुनिरत्न यांना सुरक्षितपणे वाहनापर्यंत नेले. या हल्ल्यानंतर मुनिरत्न यांना तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले. तसेच आपली हत्या करण्याचा प्रयत्न काँग्रेसकडून केला जात आहे, असा आरोपही त्यांनी केला. दरम्यान बंगळुरू पोलिसांनी या हल्ल्यातील तीन संशयित आरोपींना ताब्यात घेतले आहे.

भाजपा आमदार मुनिरत्न म्हणाले, “माझ्याबरोबर काहीही दुर्दैवी दुर्घटना घडली तर त्यासाठी उपमुख्यमंत्री डीके शिवकुमार, त्यांचे भाऊ डीके सुरेश, काँग्रेस नेत्या कुसुमा आणि त्यांचे वडील हनुमंतरायप्पा हे जबाबदार असतील. या हल्ल्याचा उद्देश मला ठार मारण्याचा होता. मी जेव्हा कार्यक्रमस्थळी पोहोचलो तेव्हा तिथे शेकडो पोलिसांचा पहारा होता. मला मारण्याचा प्रयत्न होऊ शकतो, अशी माहिती त्यांना मिळाली असल्यामुळेच एवढा बंदोबस्त लावला गेला होता.” मुनिरत्न पुढे म्हणाले की, नोव्हेंबर महिन्यात दोन इसम स्वतःला वकील असल्याचे सांगून माझ्याकडे आले होते. माझा खून होऊ शकतो, अशी माहिती त्यांनी दिली.

हे वाचा >> ‘भाजपा आमदाराने विधानसभेत बलात्कार केला, हनीट्रॅपसाठी दबाव टाकला’, पीडितेचा धक्कादायक आरोप, न्यायालयानं सुनावली कोठडी

बुधवारी झालेल्या हल्ल्यानंतर मुनिरत्न यांना केसी जनरल रुग्णालयात दाखल करण्यात आले. यानंतर त्यांनी नंदिनी लेआऊट पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. या हल्ल्याबाबत जेव्हा उपमुख्यमंत्री डीके शिवकुमार यांना विचारणा करण्यात आली तेव्हा ते म्हणाले की, त्यांना या प्रकरणाची काही माहिती नाही. माहिती घेतल्यानंतर यावर भाष्य करू.

कोण आहेत आमदार मुनिरत्न?

आमदार मुनिरत्न यांनी २०१९ साली भाजपामध्ये प्रवेश केला होता. गेल्या काही वर्षांपासून त्यांचे डीके बंधुशी असलेले संबंध ताणले गेले आहेत. २०२३ साली झालेल्या लोकसभा निवडणुकीत राजराजेश्वरी नगर मतदारसंघात मुनिरत्न यांचा पराभव करण्याचा डीके बंधून जोरदार प्रयत्न केला होता. यासाठी काँग्रेसच्या उमेदवार कुसुमा यांच्या पाठिशी सर्व ताकद उभी केली होती, पण तरीही मुनिरत्न यांचा विजय झाला.

बलात्काराचा गुन्हा दाखल

काही महिन्यांपूर्वी आमदार मुनिरत्न यांच्याविरोधात तथाकथित भाजपाच्या महिला कार्यकर्तीने बलात्काराचा गुन्हा दाखल केला होता. कग्गळीपुरा पोलीस ठाण्यात मुनिरत्न यांच्याविरोधात दाखल झालेल्या एफआयआरमध्ये भारतीय दंड विधान कायद्याच्या कलम ३५४अ, ३५४क, ३७६, ५०६, ५०४, १२० (ब), १४९, ३८४, ४०६ आणि ३०८ नुसार गुन्हा नोंदविला गेला होता. या बलात्कार प्रकरणात सोमवारी बंगळुरूच्या विशेष न्यायालयाने त्यांच्यासह इतर तीन आरोपींना अंतरिम जामीन दिला होता.

Story img Loader