Cows Slaughtered in UP: उत्तर प्रदेशमध्ये गोमांस आणि गायींच्या कत्तलीवर बंदी घालण्यात आली आहे. गायींच्या रक्षणासाठी उत्तर प्रदेश सरकारने गोशाळा उभारल्या असून अनेक गोरक्षक गायींच्या संवर्धनासाठी काम करताना दिसतात. मात्र त्याच उत्तर प्रदेशमध्ये योगी आदित्यनाथ यांचे सरकार असतानाही दररोज ५० हजार गायींची कत्तल करण्यात येत आहे, असा खळबळजनक आरोप भाजाचे आमदार नंद किशोर गुजर यांनी केला आहे. पीटीआयने दिलेल्या वृत्तानुसार नंदकिशोर गुजर म्हणाले, “आमचे सरकार असूनही दररोज ५० हजार गायींची कत्तल केली जात आहे. गायींच्या कल्याणासाठी ठरवलेला निधी अधिकारी खाऊन टाकत आहेत. सर्वत्र लूट सुरू आहे.”

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

आमदार नंदकिशोर गुजर पुढे म्हणाले, हे प्रकरण मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्यापर्यंत पोहोचले पाहीजे. अनेक आमदारांनी ही चिंता व्यक्त केली आहे. याबाबत मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांना माहिती दिली आहे की नाही? याची मला कल्पना नाही. या सर्व भ्रष्ट लोकांचे प्रमुख राज्याचे मुख्य सचिव आहेत. लोणी विधानसभा मतदारसंघात दोन पोलीस शिपायांनी पैसे उकळल्याचा एक व्हिडीओ नुकताच समोर आला होता, असेही ते म्हणाले.

हे वाचा >> भारतातील १० मोठ्या कत्तलखान्यांचे मालक हिंदू

भ्रष्ट अधिकाऱ्यांवर कारवाई केली गेली तर भाजपा पुढील निवडणुकीत ३७५ जागांवर विजयी होईल (४०३ विधानसभांपैकी), असाही दावा आमदार नंदकिशोर गुजर यांनी केला आहे. पण जर भ्रष्टाचार असाच सुरू राहिला तर भाजपा उमेदवारांची अनामत रक्कमही जप्त होऊ शकते, असा इशाराही त्यांनी दिला.

अखिलेश यादव यांची भाजपावर टीका

समाजवादी पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष आणि खासदार अखिलेश यादव यांनी आमदार नंदकिशोर गुजर यांचा व्हिडीओ एक्सवर पोस्ट केला आहे. या व्हिडीओद्वारे अखिलेश यादव म्हणाले की, भाजपामधील अंतर्गत कलहामुळे राज्याच्या सार्वजनिक प्रश्नांकडे दुर्लक्ष केले जात आहे.

उत्तर प्रदेश भाजपामध्ये आता आपापसातच आरोप-प्रत्यारोप होत आहेत. भाजपाचे मंत्री, भाजपाचे आमदार यांच्या खांद्यावर बंदूक ठेवून कुणीतरी भाजपाचाच नेता दूरवरून निशाणा साधत आहे. या सत्ता संघर्षात जनता आणि प्रशासनाची मात्र ससेहोलपट होत आहे. या सत्ता संघर्षात अधिकारी स्वतःची पोळी भाजून घेत आहेत. भ्रष्टाचाराच्या पैशांसाठीच ही लढाई सुरू आहे. आता तर भाजपाचे समर्थकही आजचा भाजपा पक्ष नको, असे म्हणू लागले आहेत.

मराठीतील सर्व देश-विदेश बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Bjp mla nand kishore gujar claims 50 thousand cows slaughtered daily accuses govt of silence kvg