BJP MLA Rajesh Chaudhary Family Members Created Ruckus in Hospital : उत्तर प्रदेशमधील मथुरा येथील मांट विधानसभेचे आमदार तथा भाजपा नेते राजेश चौधरी यांच्या भावाने व पुतण्याने एका रुग्णालयातील डॉक्टर व कर्मचाऱ्यांना मारहाण केल्याचा, रुग्णालयात तोडफोड केल्याचा व्हिडीओ सध्या समाजमाध्यमांवर व्हायरल होत आहे. हा व्हिडीओ उत्तर प्रदेशमधील मथुरा येथील मोहाली रोडवर असलेल्या डी. एस. रुग्णालयातील आहे. या व्हिडीओत दिसतंय की भाजपा आमदार राजेश चौधरी यांचे नातेवाईक रुग्णालयातील डॉक्टर व कर्मचाऱ्यांना मारहाण करत आहेत. ही हाणामारी रुग्णालयातील सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली आहे.

शनिवारी सायंकाळी भाजपा आमदार चौधरी यांच्या आईला सदर रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. डॉक्टरांनी आमदाराच्या आईवर उपचार केले आणि रात्री त्यांना रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला. मात्र रविवारी (२१ ऑक्टोबर) सकाळी आमदार चौधरी यांचे भाऊ संजय चौधरी, जितेंद्र चौधरी, पुतण्या देव चौधरी आणि त्यांचे कार्यकर्ते या रुग्णालयात दाखल झाले. या लोकांनी रुग्णालयातील डॉक्टर व नर्सना मारहाण केली. टाईम्स ऑफ इंडियाने याबाबतचं वृत्त प्रसिद्ध केलं आहे. दरम्यान, पोलिसांनी सीसीटीव्ही व्हिडीओमध्ये दिसत असलेल्या मारहाण करणाऱ्या सर्वांविरोधात गुन्हा दाखल केला आहे.

हे ही वाचा >> “तिला वाचवा, ती मरेल”, एवढं बोलून प्रियकर कोसळला; रक्ताच्या थारोळ्यात प्रेयसीला पाहून प्रियकराचा ओढवला मृत्यू!

सीसीटीव्ही व्हिडीओत स्पष्ट दिसतंय की काही लोकांची टोळी रुग्णालयात घुसली आणि त्यांनी एका खोलीमधील तीन जणांना मारहाण करण्यास सुरुवात केली. त्याचवेळी एक महिला या सर्वांना रोखण्यासाठी पुढे सरसावली मात्र, या जमावाने त्या महिलेला धक्के देऊन बाजूला केलं. तसेच हा जमाव डॉक्टर व कर्मचाऱ्यांना मारहाण करून तिथून निघून जाताना दिसत आहे.

पोलिसांकडून गुन्हा दाखल, पीडित डॉक्टर कारवाईच्या प्रतीक्षेत

या मारहाणीत जखमी झालेल्या डॉक्टरांनी जवळच्या पोलीस ठाण्यात जाऊन तक्रार दाखल केली आहे. तसेच आरोपींविरोधात कारवाई करण्याची मागणी केली आहे. मांट विधानसभा मतदारसंघाचे आमदार राजेश चौधरी यांनी अद्याप यावर कोणत्याही प्रकारची प्रतिक्रिया दिलेली नाही.

हे ही वाचा >> “भारताकडे डबल AI ची शक्ती, एक म्हणजे आर्टिफिशियल इंटेलिजन्स अन् दुसरी…”; नेमकं काय म्हणाले पंतप्रधान मोदी?

दरम्यान, या प्रकरणाची माहिती देताना मथुरा पोलिसांनी एक्स या मायक्रोब्लॉगिंग प्लॅटफॉर्मवर एक पोस्ट केली आहे. या पोस्टमध्ये त्यांनी म्हटलं आहे की मोहाली रोडवरील रुग्णालयात झालेल्या हाणामारीच्या घटनेप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. स्थानिक पोलीस कारवाई करत आहेत.