भाजपाचे वादग्रस्त आमदार संगीत सोम यांच्या उत्तर प्रदेशमधील मीरत येथील घरावर बुधवारी मध्यरात्रीच्या सुमारास काही अज्ञात व्यक्तींनी हल्ला केला. घरावर अंदाधुंद गोळीबार करण्यात आला. तसेच हँड ग्रेनेडही फेकण्यात आले. सुदैवाने या हल्ल्यात कोणतीही जीवितहानी झाली नाही. आमदार सोम हे सुरक्षित आहेत. जो ग्रेनेड फेकण्यात आला होता. त्याचा स्फोट न झाल्याने मोठी दुर्घटना टळली.

दरम्यान, आमदार सोम यांनी आपल्याला कोणत्याही प्रकारचा धमकीचा फोन आला नसल्याचे माध्यमांना सांगितले. पण दोन वर्षांपूर्वी माझ्या घरावर ग्रेनेड हल्ला करु अशी धमकी देण्यात आली होती, असेही ते म्हणाले. संगीत सोम अनेकवेळा आपल्या वक्तव्यांमुळे नेहमी चर्चेत असतात. त्यांना झेड श्रेणीची सुरक्षा पुरवण्यात येते.

हल्ल्याचे वृत्त समजताच घटनास्थळी मीरतच्या वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांनी धाव घेतली. ही घटना १२.४५ च्या सुमारास घडली अशी माहिती सुरक्षा रक्षकाने दिल्याचे एका पोलीस अधिकाऱ्याने सांगितले. घटनास्थळी रिकामी काडतुसे आणि भिंतीवर गोळीबाराचे निशाण आढळून आले असून फॉरेन्सिक पथकाकडून तपास सुरु आहे. एक हँड ग्रेनेडही जप्त करण्यात आले आहे. या हल्ल्यात कोणाला इजा झालेली नाही. सुरक्षा रक्षकाची केबिन आणि मुख्य दरवाजावर गोळीबार करण्यात आला होता, असेही या अधिकाऱ्याने सांगितले.

Story img Loader