भारतामध्ये गरीब नेते मंडळी सापडणे तसे दूर्मिळच. मात्र मध्य प्रदेशमध्ये नुकत्याच झालेल्या निवडणुकीमध्ये निवडूण आलेले सीताराम आदिवासी हे अशाच दूर्मिळ नेत्यांपैकी एक आहेत. सीताराम हे एका झोपट्टीमधील छोट्या झोपडीवजा घरामध्ये राहतात. नुकतेच आमदार झालेले सीताराम इतके गरीब आहेत की आता त्यांच्या गावातील लोकांनी पैसे गोळा करुन त्यांना चांगले दोन खोल्यांचे घर बांधून देण्याचा निर्णय घेतला आहेत.

नोव्हेंबर महिन्यामध्ये झालेल्या विधानसभा निवडणुकांमध्ये सीताराम हे सोहनपूरमधील विजयपूर मतदार संघामधून निवडूण आले आहेत. काँग्रेसचे दिग्गज नेते रामनिवास रावत यांचा पराभव करुन सीताराम हे पहिल्यांदाच निवडूण आले आहेत. २००८ आणि २०१३ साली पराभव झाल्यानंतर हार न मानता त्यांनी २०१८ मध्ये पुन्हा निवडणुक लढवली आणि ती जिंकलीही. साधारणपणे मध्य प्रदेशमध्ये आमदाराला १ लाख १० हजार इतका पगार मिळतो. मात्र आमदार झाल्यानंतरही सीताराम यांना अद्याप पहिला पगार मिळालेला नाही. विजयपूर मतदारसंघातील जनतेने आता आपल्या आमदारासाठी चांगले घर बांधण्याच्या उद्देशाने वर्गणी गोळा करण्याचा निर्णय घेतला आहे. मतदारसंघातील पिंपरानी गावात सीताराम राहतात. सीताराम यांना मूलबाळ नाही ते आपल्या पत्नीबरोबर सध्या झोपडीवजा घरात राहतात. त्यांच्याच गावात राहणारा धनराज याने आता गावकऱ्यांनी पैसे गोळा करुन सीताराम यांना घर बांधून घेण्याचा निर्णय घेतल्याचे सांगतो. धनराज म्हणतो, ‘आमच्या मतदारसंघाचे आमदार अशा जागी राहतात हे शोभणारे नाही. म्हणून आम्ही पैसे गोळा करुन त्यांना दोन खोल्यांचे घर बांधून देणार आहोत.’

तिसऱ्यांदा निवडणूक लढवल्यानंतर आमदार झालेले सीताराम हे आजही अगदी साधे आयुष्य जगतात. रोज ते आपल्या झोपडीबाहेरील खाटेवर पडून आराम करतात. तर सकाळी आंगाभोवती घोंगडी घेऊन गावामध्ये फेरफटका मारतात. आमदार झाल्यानंतरही त्याच्या या दिनक्रमामध्ये फरक पडलेला नाही. गावकरी म्हणतात सीताराम हे कायमच गावकऱ्यांचासाठी संघर्ष करताना दिसतात. जेव्हा जेव्हा गावकऱ्यांना गरज असते सीताराम त्यांना त्यांच्यापरीने मदत करतात. याबद्दल बोलताना सीताराम म्हणतात, ‘माझ्याकडे पैसा नसला तरी एक लहानसे घर आहे. आता आमदार झाल्यानंतर पक्के घर बांधण्यासाठी लोकांनी मला १०० ते १००० रुपये दिले आहेत. हे पैसे लोकांनी मला निवडणुक जिंकल्यानंतर भेट म्हणून दिले आहेत. इतकेच नाही तर विजयपूरमध्ये जनतेने माझी नाण्यांमध्ये तुला केली. आत्तापर्यंत मिळालेले पैसे वापरुन एका छोट्या घराच्या बांधकामाला सुरुवात केली आहे.’

सीताराम यांच्या पत्नी इमरतीबाई म्हणतात, ‘माझ्या पतीने आयुष्यभर संघर्ष केल्याचे सांगतात. आत्ता आम्हाला चांगले दिवस आले आहेत. अपेक्षा आहे की येणाऱ्या दिवसांमध्ये आमची आर्थिक स्थिती सुधरेल आणि आयुष्य थोडे सुखकर होईल.’ सीताराम लोकांची कामे ही स्वत: काम असल्यासारखे त्याचा पाठपुरावा करुन पूर्ण करुन घेतात. त्यामुळे ते स्थानिकांमध्ये लोकप्रिय आहेत. २०१८ च्या विधानसभा निवडणुकांमध्ये सीताराम यांनी दिलेल्या प्रतिज्ञापत्रामध्ये त्यांची एकूण संपत्ती केवळ ४६ हजार ७३३ रुपये इतकी आहे. यामध्ये २५ हजार रुपयांची रोकड आणि २१ हजार ७३३ रुपये बँकेतील ठेवींचा समावेश आहे. याशिवाय त्यांच्या नावावर २.८१७ एकर जमिनीचा तुकडा आहे. तसेच त्यांचे राहते घर हे त्यांना त्यांच्या वडिलांकडून मिळाले आहे. या घराचे सध्याचे बाजार मुल्य ५ लाख रुपये इतके आहे.

Story img Loader