कलंगुट-बागा सागरी पट्टय़ातील सर्व डान्स बार बंद करावेत, या मागणीसाठी गोव्यातील सत्तारूढ भाजपचे आमदार मायकेल लोबो यांनी सोमवारी एक दिवसाचे उपोषण केले.
लोबो यांनी आपल्या समर्थकांसह बागा जंक्शन येथे उपोषण केले. डान्स बारमुळे या परिसरातील महिलांमध्ये असुरक्षिततेची भावना निर्माण झाली आहे तरीही राज्य सरकार बारविरुद्ध कोणतेही कारवाई करीत नसल्याचा आरोप लोबो यांनी केला.
या पट्टय़ात सुरू असलेले डान्स बार बेकायदेशीर असून त्यामुळे वेश्या व्यवसायास उत्तेजन मिळते आणि म्हणूनच येथील महिलांना असुरक्षित वाटत आहे, असेही लोबो म्हणाले. गोव्याबाहेरील काही बडे व्यावसायिक सदर व्यवसाय करीत आहेत. त्यांनी व्यवसाय करण्यास हरकत नाही, मात्र तो कायदेशीर असावा, असेही ते म्हणाले.
गेल्या आठवडय़ात लोबो यांच्या नेतृत्वाखालील निदर्शकांनी या परिसरातील चार बेकायदेशीर बार तोडले होते. गोव्याचे मुख्यमंत्री लक्ष्मीकांत पार्सेकर यांनी दूरध्वनीवरून लोबो यांच्याशी संपर्क साधला. बेकायदेशीरपणे चालविण्यात येणारे सर्व व्यवहार बंद केले जातील, असे आश्वासन मुख्यमंत्र्यांनी दिल्याचे लोबो यांनी सांगितले.

Story img Loader