BJP MLA Usha Thakur in Madhya Pradesh : मध्य प्रदेश सरकारमधील माजी मंत्री व विद्यमान आमदार उषा ठाकूर यांनी एक वादग्रस्त वक्तव्य केलं आहे. हासलपूर येथे आयोजित एका कार्यक्रमात त्या उपस्थित लोकांना संबोधित करताना म्हणाल्या, “मत विकणं हे मोठं पाप आहे. जे लोक भाजपाला मत देत नाहीत, मद्य व साडीच्या बदल्यात आपलं मत विकून टाकतात, ते पुढच्या जन्मी ऊंट, शेळ्या-मेंढ्या किंवा कुत्र्या-मांजराचा जन्म घेतील. ते लोक पुढच्या जन्मी जनावर बनतील. लक्षात ठेवा, कधीही मत देताना केवळ भाजपालाच मत देत जा. जे लोक संस्कृती व देशाबद्दल बोलतात त्यांनाच मत द्या.
उषा ठाकूर यांनी यावेळी एक मोठा दावा केला आहे. त्या म्हणाल्या, “माझा थेट ईश्वराशी संपर्क आहे. माझं ईश्वराशी बोलणं होतं, हे लक्षात ठेवा. लाडली बहना योजना आणि किसान सन्मान निधीसारख्या अनेक योजनांच्या माध्यमातून सरकार दर महिन्याला लोकांच्या खात्यात थेट पैसे जमा करत आहे. इतकं सगळं करूनही तुम्ही जर ५०० रुपये, १,००० रुपये, मद्य किंवा साडीच्या बदल्यात तुमचं मत विकत असाल तर ही खूप लाजिरवाणी बाब आहे.”
उषा ठाकूर यांनी गरबा मंडपात ओळखपत्राशिवाय प्रवेश न देण्याची मागणी केली होती
उषा ठाकूर यांनी याआधी देखील अशी वादग्रस्त वक्तव्ये केली आहे. वादग्रस्त वक्तव्यांमुळे त्या नेहमी चर्चेत असतात. नवरात्रोत्सवाच्या काळात ठिकठिकाणी गरबा-दांडियाचं आयोजन केलं जातं. यावरून ठाकूर यांनी मध्य प्रदेश सरकारकडे मागणी केली होती की “गरबा महोत्सवात ओळखपत्राशिवाय कोणालाही प्रवेश देऊ नये. नवरात्रीचं पर्व हे शक्ती व साधनेचं पर्व असतं. संपूर्ण समाजाच्या शक्तीत वृद्धी व्हावी, लोकांनी शस्त्र व शास्त्राची साधना करावी, ही आमची नवरात्रोत्सवात अपेक्षा असते. मात्र, काही ठिकाणी गैरप्रकार घडतात. त्यामुळे गरबा मंडपात ओळखपत्राशिवाय कोणालाही प्रवेश दिला जाऊ नये.”
आमदार उषा ठाकूर म्हणाल्या, “गरबा मंडपात येणाऱ्या प्रत्येक व्यक्तीकडे त्याचं ओळखपत्र असायला हवं, त्याशिवाय त्यांना मंडपात प्रवेश देऊ नये. ज्याला गरबा मंडपात यायचं असेल त्याने आपलं ओळखपत्र घेऊन यावं. कोणीही स्वतःची ओळख लपवून गरबा मंडपात येऊ नये. तुमच्या कुटुंबासह नवरात्रोत्सवात सहभागी व्हा आणि गरब्याचा आनंद घ्या. आमचा त्यावर काहीच आक्षेप नाही. परंतु, तुम्ही तुमची ओळख लपवून गरबा खेळायला येत असाल आणि लव्ह जिहाद करत असाल तर आम्ही हे प्रकार रोखू. आम्ही लव्ह जिहादला प्रोत्साहन देणार नाही आणि कोणी तसं करत असेल तर ते रोखणार.”