पीटीआय, जयपूर : भाजपने आमदार शोभाराणी कुशवाह यांना पक्षातून बुधवारी बडतर्फ केले. राजस्थानमध्ये झालेल्या राज्यसभा निवडणुकीत त्यांनी काँग्रेसला मतदान केले होते. त्यांना दिलेल्या पत्रात भाजपचे केंद्रीय शिस्तपालन समितीचे सचिव ओम पाठक यांनी नमूद केले आहे, की शिस्तभगांबद्दल त्यांच्यावर स्वतंत्र कारवाई केली जाईल.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

कुशवाह यांना पक्षांच्या सर्व जबाबदाऱ्यांतून मुक्त करून बडतर्फीची कारवाई तातडीने अमलात आणण्यात आली. १० जूनला झालेल्या राज्यसभा निवडणुकीत कुशवाह यांनी काँग्रेसचे उमेदवार प्रमोद तिवारी यांना पक्षादेश झुगारून मतदान केले. त्याबद्दल भाजपने त्यांना ‘कारणे दाखवा’ नोटिस बजावली होती व त्याच दिवशी पक्षातून निलंबित केले होते. कुशवाह यांना १९ जूनपर्यंत उत्तर देण्याची मुदत दिली गेली होती. परंतु, त्याआधीच त्यांनी प्रसारमाध्यमांशी बोलताना भाजपविरोधी वक्तव्ये केली होती. त्या म्हणाल्या होत्या, की राज्यसभा निवडणुकीत भाजपने मला अशा अपक्ष उमेदवाराला मतदान करायला सांगितले होते, जो स्वत: उघडपणे प्रतिपक्षाला मतदान करण्याविषयी बोलत होता. शोभाराणी कुशवाह या बहुजन समाज पक्षाचे माजी आमदार बी. एल. कुशवाह यांच्या पत्नी आहेत. बी. एल. कुशवाह यांना एका खुनाच्या गुन्ह्यात डिसेंबर २०१६ मध्ये आमदारपदावरून हटवण्यात आले होते. त्यानंतर झालेल्या पोटनिवडणुकीत कुशवाह भाजपतर्फे २०१७ मध्ये निवडून आल्या. नंतर २०१८ च्या विधानसभा निवडणुकीत त्या पुन्हा विजयी झाल्या होत्या.