पीटीआय, बंगळूरु
कर्नाटकमधील भाजप आमदारांनी बुधवारी काँग्रेस सरकारच्या कथित अपयशाच्या निषेधार्थ मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांच्या कार्यालयाला घेराव घालण्याचा प्रयत्न केला तेव्हा प्रतिबंधात्मक कारवाई करत पोलिसांनी त्यांना अटक केली. भाजपचे प्रदेशाध्यक्ष बी. वाय. विजयेंद्र यांच्या नेतृत्वाखाली भाजप आमदार आणि नेत्यांनी कर्नाटकचे राज्य विधिमंडळ आणि सचिवालय असलेल्या विधान सौधाजवळील महात्मा गांधींच्या पुतळय़ासमोर धरणे आंदोलन केले.
त्यानंतर, त्यांनी विधानसौधाच्या आत मुख्यमंत्र्यांच्या कार्यालयाकडे मोर्चा वळवला. मुख्यमंत्री सिद्धरामय्या सध्या दिल्लीत आहेत. त्यानंतर पोलिसांनी या आंदोलकांवर प्रतिबंधात्मक कारवाई करत त्यांना अटक केली. सिद्धरामय्या यांच्या नेतृत्वाखाली कर्नाटकमधील सत्ताधारी काँग्रेस पक्षाने आर्थिक न्यायासाठी लढा देण्यासाठी दिल्लीत केंद्र सरकारविरुद्ध आयोजित केलेल्या धरणे आंदोलनाला काटशह देण्यासाठी भाजपने हे आंदोलन केले.
हेही वाचा >>>“पांडवांनी पाच गावे मागितली होती, आम्ही तर…”, योगी आदित्यनाथ यांची विधानसभेत तुफान फटकेबाजी
भाजपच्या आंदोलकांनी फलक हातात घेऊन दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांना मदत देण्यास आणि दूध उत्पादकांना प्रोत्साहनपर योजना देण्यात अपयशी ठरल्याचा आरोप करत काँग्रेस सरकारचा निषेध करत घोषणाबाजी केली. माजी मुख्यमंत्री बसवराज बोम्मई, कर्नाटक विधानसभेतील विरोधी पक्ष नेते आर. अशोक, विधान परिषदेतील विरोधी पक्षनेते कोटा श्रीनिवास पुजारी आणि अनेक माजी मंत्री आंदोलनात सहभागी झाले होते.
यावेळी बोम्मई म्हणाले, की कर्नाटकच्या इतिहासात केंद्राविरोधात नवी दिल्ली येथे निदर्शने करण्याचे नाटक करणारे अन्य कोणतेही सरकार नव्हते. कर्नाटक सरकार-प्रशासन असो, कायदा-सुव्यवस्था अशा प्रत्येक बाबतीत अपयशी ठरले आहे.