भाजपाने लोकसभेत काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधींविरोधात हक्कभंगाची नोटीस बजावली आहे. राहुल गांधी हे राफेल प्रकरणी देशाशी खोटे बोलले असून त्यांनी चुकीचे वक्तव्य केल्याचा आरोप भाजपाने केला आहे. भाजपाचे खासदार अनुराग ठाकूर यांनी लोकसभेत हक्कभंगाचा प्रस्ताव आणला आहे.

राहुल गांधी गेल्या काही काळापासून भाजपावर राफेल विमान खरेदी प्रकरणात भ्रष्टाचार केल्याचा आरोप करत आहेत. तर दुसरीकडे सर्वोच्च न्यायालयाने राफेलप्रकरणी केंद्र सरकारला क्लीन चिट दिली आहे. राफेल व्यवहाराप्रकरणी सर्वोच्च न्यायालयात आलेल्या निर्णयानंतर भाजपा, काँग्रेसवर सातत्याने टीका करत आहे. याच पार्श्वभूमीवर भाजपाचे दिग्गज मंत्री, मुख्यमंत्री आणि नेते देशभरात पत्रकार परिषद घेऊन राफेल व्यवहाराचे सत्य सांगत आहेत.

हक्कभंग म्हणजे काय ?
देशात विधानसभा, विधान परिषद आणि संसदेच्या सदस्यांकडे काही विशेष अधिकार असतात. प्रभावी पद्धतीने आपले कर्तव्य पार पाडण्यासाठी हे अधिकार असतात. जेव्हा सभागृहात या विशेषाधिकाराचे उल्लंघन होते किंवा या अधिकारांविरोधात एखादे कार्य केले जाते. तेव्हा तो हक्कभंग समजला जातो. त्यावेळी सभागृहाच्या अध्यक्षांकडे केलेल्या लेखी तक्रारीला हक्कभंगाची नोटीस म्हणतात.