सात कुस्तीपटूंनी लैंगिक शोषणाचे आरोप केलेले भाजपाचे खासदार आणि भारतीय कुस्तीपटू संघटनेचे प्रमुख ब्रिजभूषण सिंह यांनी वादग्रस्त विधान केलं आहे. स्वतःची तुलना प्रभू श्रीराम यांच्याशी करत त्यांनी पीडित महिला कुस्तीपटू विनेश फोगाटला महाभारतातील कैकेयीची सेविका मंथरेची उपमा दिली. ते गोंडामधील रघुकुल विद्यापीठात बोलत होते. यानंतर नव्या वादाला तोंड फुटले आहे. लैंगिक अत्याचाराचे गंभीर आरोप झालेले असताना त्यापासून स्वतःचा बचाव करण्यासाठी असे वक्तव्य केल्याने ब्रिजभूषण यांच्यावर जोरदार टीका होत आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

ब्रिजभूषण सिंह म्हणाले, “रामाच्या वनवासाला मंथरा जबाबदार होती. तिनेच कैकेयीचे कान भरले आणि भरताला सिंहासनावर बसवण्यासाठी रामाला वनवासाला पाठवण्यास सांगितले. तसेच रामाचा राज्याभिषेक झाला असता, तर ते मर्यादापुरुषोत्तम झाले नसते.”

“मी विनेश फोगाटला धन्यवाद देतो”

“जशी महाभारतात मंथरा आणि कैकेयीने भूमिका निभावली होती, त्याचप्रमाणे विनेश फोगाट माझ्यासाठी मंथरेच्या भूमिकेतून काम करत आहे. ती माझ्यासाठी मंथरा बनून आली आहे. लोक जसे मंथरा आणि कैकेयीला धन्यवाद देतो, तसेच मी विनेश फोगाटला धन्यवाद देईल,” असं म्हणत ब्रिजभूषण यांनी विनेश फोगाटवर टीका केली.

“लैंगिक अत्याचारविरोधी कायद्याचा डोनाल्ड ट्रम्प यांनाही त्रास झाला”

ब्रिजभूषण सिंह यांनी त्यांच्यावरील लैंगिक अत्याचाराचे आरोप चुकीचे असल्याचं म्हणत लैंगिक अत्याचारविरोधी कायद्यांचा गैरवापर होतो, असा आरोप केला. यासाठी त्यांनी अमेरिकेचे माजी अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचं उदाहरण दिलं. ते म्हणाले, “लैंगिक अत्याचाराच्या आरोपांमुळे लोक आत्महत्या करतात. या लैंगिक अत्याचारविरोधी कायद्याचा डोनाल्ड ट्रम्प यांनाही त्रास झाला. मलाही या वयात आणखी एक लढाई लढावी लागेल.” मात्र, ट्रम्प लैंगिक अत्याचारप्रकरणात दोषी सिद्ध झाले आणि त्यांना न्यायालयाने शिक्षाही सुनावली, याचा उल्लेख त्यांनी करणं टाळलं.

हेही वाचा : “मीच का, जेवढ्या मुलींनी तक्रार केलीये त्या…”, विनेश फोगाटचं ब्रिजभूषण सिंह यांना खुलं आव्हान!

आपण कुस्तीपटूंवर कोट्यावधी रुपये खर्च करतो. जे लोक पाया पडायचे, त्यांची आज भाषा बदलली आहे, असं म्हणत त्यांनी पीडित महिला कुस्तीपटूंवर टीका केली. ते या ठिकाणी अयोध्यामध्ये ५ जून रोजी होणाऱ्या जन चेतना रॅलीच्या तयारीच्या बैठकीसाठी आले होते. या रॅलीत संतांनी ११ लाख लोकांना येण्याचं आाहन केलं आहे.

मराठीतील सर्व देश-विदेश बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Bjp mp accused of sexual harassment brijbhushan singh controversial statement about vinesh phogat pbs