देशात नवं सरकार स्थापन झाल्यानंतर १८ व्या लोकसभेचं पहिलं अधिवेशन चालू झालं आहे. सोमवारपासून (२४ जून) सुरू झालेलं हे अधिवेशन पुढील १० दिवस चालणार आहे. या अधिवेशनात कालपासून नवनिर्वाचित खासदारांचे शपथविधी चालू आहेत. अधिवेशनाच्या पहिल्या दिवशी २६६ खासदारांचे शपथविधी झाले. तर उर्वरित खासदारांचे शपथविधी दुसऱ्या दिवशी देखील चालू आहेत. बहुसंख्य खासदारांनी ईश्वराचं नाव स्मरून शपथ घेतली, तर काही खासदारांनी ‘सत्यनिष्ठा प्रतिज्ञा’ घेतली. अनेक खासदारांनी शपथविधीनंतर ‘जय हिंद’ची घोषणा दिली. तर काही खासदारांनी या घोषणेबरोबरच त्यांच्या राज्याच्या नावाने घोषणा दिली. महाराष्ट्रातील अनेक खासदारांनी ‘जय हिंद’, ‘जय महाराष्ट्र’, ‘जय शिवराय’ अशी घोषणा दिली. तर ठाकरे गटाचे खासदार नागेश आष्टीकर यांनी शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचं नाव घेतल्याने त्यांना लोकसभेच्या हंगामी अध्यक्षांनी पुन्हा शपथ घ्यायला सांगितली. दरम्यान, भाजपाच्या एका खासदाराने शपथविधीनंतर दिलेल्या घोषणेने सभागृहात गोंधळ उडाल्याचं पाहायला मिळालं.
उत्तर प्रदेशमधील बरेली लोकसभेचे खासदार छत्रपाल सिंह गंगवार यांनी शपथविधीनंतर ‘जय हिंदू राष्ट्र’, ‘जय भारत’ अशी घोषणा दिली. यावर विरोधी पक्षांमधील खासदारांनी आक्षेप नोंदवला. तसेच ही घोषणा संविधानविरोधी असल्याचं नमूद केलं. संविधानाची शपथ घेऊन संविधानविरोधी घोषणा देणं चुकीचं आहे, असं विरोधी पक्षांमधील खासदार म्हणाले. हा संविधानाचा अपमान असल्याचा सूरही विरोधकांनी आळवला. राहुल गांधी, के. सी. वेणुगोपाल आणि समाजवादी पार्टीचे प्रमुख अखिलेश यादव यांनीदेखील याचा विरोध केला. तत्पूर्वी गाझियाबादचे खासदार अतुल गर्ग यांनी शपथ घेतल्यानंतर राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे संस्थापक ‘केशव बळीराम हेडगेवार की जय’ अशी घोषणा दिली.
हे ही वाचा >> लोकसभा अध्यक्षांच्या उमेदवारीवरून इंडिया आघाडीत बिनसलं? तृणमूलच्या भूमिकेमुळे पहिल्याच अधिवेशनात राडा?
दरम्यान, एमआयएमचे खासदार असदुद्दीन ओवैसी यांनी शपथविधीनंतर ‘जय पॅलेस्टाईन’ अशी घोषणा दिली. या शपथीनंतर नवा वाद निर्माण होण्याची शक्यता आहे. ओवैसींच्या शपथविधीनंतर भाजपाच्या खासदारांनी संसदेत मोठा गोंधळ घातला होता. हैदराबादचे खासदार ओवैसी शपथ घेण्यासाठी आले, तेव्हा राधा मोहन सिंह हे पीठासीन अधिकारी म्हणून काम पाहत होते. यावेळी त्यांनी असदुद्दीन ओवैसी यांना खासदारकीची शपथ दिली. मात्र, त्यांनी शपथ पूर्ण करताच, ‘जय भीम’, ‘जय मीम’, ‘जय पॅलेस्टाईन’ अशी घोषणा दिली. त्यामुळे अनेकांनी आश्चर्य व्यक्त केलं. तसेच भाजपाच्या खासदारांनी याचा जोरदार विरोध केला. गेल्या काही महिन्यांपासून इस्रायल-पॅनलेस्टाईन संघर्ष चालू आहे. भारताने या युद्धात कोणत्याही एका देशाची बाजू घेतलेली नाही. अशातच भारताच्या संसदेत जय पॅलेस्टाईन अशी घोषणा देऊन ओवैसी यांनी पॅलेस्टाईनची बाजू घेतली आहे.