ऑल इंडिया मजलिस ए इत्तेहादूल मुसलमीन (AIMIM) पक्षाचे प्रमुख असदुद्दीन ओवैसी यांच्यावर झालेल्या गोळीबारानंतर भाजपाच्या एका खासदाराने या हल्ल्यावर टीका केलीय. असदुद्दीन ओवैसी देशभक्त आहेत, असं मत भाजपा खासदार सुब्रमण्यम स्वामी यांनी व्यक्त केलं. तसेच ओवैसींवर कट्टरतावादी विचाराचाच व्यक्ती हल्ला करू शकतो, असंही सुब्रमण्यम स्वामी यांनी म्हटलं. त्यांनी ट्वीट करत आपली भूमिका मांडली.
सुब्रमण्यम स्वामी म्हणाले, “केवळ तर्कहीन कट्टरतावादीच ओवैसी यांची हत्या करण्याचा प्रयत्न करेल. ओवैसी राष्ट्रवादी नसले तरीही ते देशभक्त आहेत, पण त्यांच्याशी हिंदू-मुस्लीम डीएनएवर (DNA) मतभेद आहेत. ओवैसी आपल्या देशाचं संरक्षण करतील. मात्र, हिंदू मुस्लीम यांचा डीएनए एकच असल्याचं ते मानत नाहीत. त्यावर आमचे मतभेद आहेत. त्यांच्या तर्कांचा प्रतिवाद मुद्देसुद युक्तिवादाने करावा, रानटीपणाने नाही.”
ओवैसी यांच्या वाहनावर गोळीबार
लोकसभा खासदार असदुद्दीन ओवैसी यांच्या वाहनावर गुरुवारी (३ फेब्रुवारी) गोळीबार झाला. उत्तर हापूर येथून दिल्लीला जाताना हापूर-गाझियाबाद राष्ट्रीय महामार्गावर सायंकाळी अज्ञान व्यक्तींनी हल्ला केल्याचे ओवैसी यांनी सांगितले. या हल्ल्यात कुणीही जखमी झाले नाही.
हेही वाचा : Attack on Owaisi : असदुद्दीन ओवेसींनी Z श्रेणीची सुरक्षा नाकारली, म्हणाले…
हापूर पोलिसांची विविध पथके याप्रकरणी तपास करत असून एकाला अटक करण्यात आल्याची माहिती पोलिसांनी दिली. उत्तर प्रदेश निवडणुकीसाठी ओवैसी मीरत येथे गेले होते. तेव्हा तीन ते चार हल्लेखोरांनी वाहनाच्या दिशेने ४ गोळ्या झाडल्याचं ओवैसी यांनी सांगितलं होतं.