राजस्थान विधानसभा निवडणुकीपूर्वी भाजपाला मोठा धक्का बसला आहे. राजस्थानमधील दौसा लोकसभा मतदारसंघाचे खासदार हरीश मीना यांनी बुधवारी काँग्रेसमध्ये प्रवेश केला आहे. काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष सचिन पायलट आणि सरचिटणीस अशोक गहलोत यांच्या उपस्थितीत त्यांनी पक्ष प्रवेश केला.

अशोक गहलोत यांनी मीना यांचे स्वागत केले आहे. देशातील मोठे नेते काँग्रेसबरोबर येत आहेत. भाजपा केवळ राम मंदिरबाबत बोलत आहे. भाजपात केवळ पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि अमित शाह यांचेच चालते. मीना यांच्या पक्ष प्रवेशामुळे काँग्रेस आणखी मजबूत होईल, असे गहलोत यांनी म्हटले आहे.

त्याचबरोबर काँग्रेसमध्ये कोणतेही मतभेद नसल्याचे त्यांनी स्पष्ट केले. आपण स्वत: आणि सचिन पायलट दोघेही विधानसभा निवडणूक लढवणार असल्याचे त्यांनी जाहीर केले.

दरम्यान, मीना यांनी भाजपा सोडण्यापूर्वी कोणाशीही चर्चा केली नसल्याचे सांगितले. मी आज भाजपाचा राजीनामा देईन. माझी काँग्रेसमध्ये घरवापसी झाली आहे. पूर्वी थोडा नाराज होतो, म्हणून पक्ष सोडला होता. आता नाराजी दूर झाली आहे. कोणत्याही अटींशिवाय मी काँग्रेसमध्ये सहभागी झालो आहे. पक्ष जो सांगेल ते काम मी करेन असे म्हणत भाजपाने काहीच काम केले नसल्याचा आरोपही त्यांनी केला.

दुसरीकडे नागौर मतदारसंघातील भाजपाचे आमदार हबीब उर रहमान यांनीही काँग्रेसमध्ये प्रवेश केला आहे. भाजपा उमेदवारांच्या पहिल्या यादीत त्यांचे नाव आले नव्हते. त्यानंतर त्यांनी नाराज होत पक्षाचा त्याग केला होता.