अयोध्येत रामाचं मंदिर उभं राहतं आहे ही खूपच चांगली आणि आनंदाची बाब आहे. आता आमची मागणी आहे की कृष्णाचं भव्य मंदिर मथुरेत उभं रहावं असं भाजपा खासदार आणि अभिनेत्री हेमामालिनी यांनी म्हटलं आहे. ANI या वृत्तवाहिनीशी त्यांनी अयोध्येत संवाद साधला. त्यावेळी त्यांनी ही मागणी केली आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

काय म्हटलं आहे भाजपा खासदार हेमा मालिनी यांनी?

“मथुरेत कृष्णाचं भव्य मंदिर झालं पाहिजे. मथुरेत जर तुम्ही नजर मारलीत तर तुम्हाला कळेल की हे मंदिरांचं शहर आहे. मात्र कृष्णजन्मस्थळ तोडून तिथे मशिद बांधण्यात आली. हा प्रश्न जर सुटला तर खूपच चांगलं होईल. मथुरा हे भगवान कृष्णाची जन्मभूमी आहे. या ठिकाणी भव्य मंदिर झालं पाहिजे. मशिदीचा वाद जो आहे तो मिटला पाहिजे. आत्ता तिथे मंदिर आहे. ते मंदिर सुंदर आहे, मात्र या ठिकाणी भव्य मंदिर बांधलं गेलं पाहिजे.” असं हेमा मालिनी यांनी म्हटलं आहे.

मथुरेतील कृष्णजन्मभूमीचा वाद हा देखील यापुढचा मुद्दा असू शकतो. ग्यानवापी मशिद प्रकरणाची सुनावणी अजूनही सुरू असताना आता रामजन्मभूमीप्रमाणेच कृष्ण जन्मभूमीचा वाद देखील वाढू लागला आहे. यासंदर्भात न्यायालयात सुनावणी सुरू असून त्यावर दोन्ही बाजूंकडून दावे-प्रतिदावे केले जात आहेत.

ऐतिहासिक नोंदींनुसार ही शाही इदगाह मशीद औरंगजेबाच्या निर्देशांनुसार १६७०मध्ये बनवण्यात आली होती. ती कथितरित्या पूर्वीच्या मंदिराच्या जागेवरच बांधण्यात आल्याचा दावा केला जातो. या भागाला ‘नझूल’ म्हटलं जायचं. त्यानंतर ही जमीन मराठ्यांच्या मालकीची झाली. पुढे जमिनीचा ताबा ब्रिटिशांकडे गेला. १८१५साली वाराणसीच्या राजा पत्नीमल यांनी ब्रिटिश इस्ट इंडिया कंपनीनं केलेल्या लिलावात ही १३.३७ एकरची जमीन खरेदी केली होती.

हे पण वाचा- Hema Malini on Amit Shah: अमित शाहंचं कौतुक करताना संसदेत हेमा मालिनींनी ऐकवला अक्षय कुमारचा डायलॉग!

राजा पत्नीमल यांच्या वारसांनी ही जमीन पुढे जुगल किशोर बिर्ला यांना विकली. तिची नोंदणी पंडित मदन मोहन मालवीय, गोस्वामी गणेश दत्त आणि भिकेन लालजी अत्रे यांच्यानावे करण्यात आली. यानंतर कृष्णजन्मभूमी ट्रस्टची स्थापना करण्यात आली. या जमिनीवरील कत्र केशव देव मंदिराचा मालकीहक्क याच ट्रस्टकडे आहे.

या जमिनीसंदर्भातल्या याचिका आणि सुनावण्यांमध्ये १९६८ साली मंदिर आणि इदगाहदरम्यान झालेल्या तडजोड कराराचा संदर्भ अनेकदा आला आहे. हा करार फसवणूक करून करण्यात आल्याचा दावा मंदिर ट्रस्टकडून करण्यात आला आहे.

मराठीतील सर्व देश-विदेश बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Bjp mp hema malini demand about krishna temple at krishna janmasthal in mathura scj