भाजपा खासदार हेमा मालिनी यांचं मोठं वक्तव्य आता समोर आलं आहे. पुढची निवडणूक लढवण्यासाठी मला संधी दिली तर मथुरेतूनच ती निवडणूक लढवेन कुठल्याही इतर जागेवरुन नाही असं त्यांनी म्हटलं आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृ्त्वातील सरकारची नऊ वर्षे पूर्ण झाली. त्यानिमित्ताने त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला. यावेळी त्या म्हणाल्या की मथुरेतून लढायला मिळालं तरच लोकसभा निवडणूक लढवेन इतर कुठल्याही जागेवरुन नाही.
नेमकं काय म्हणाल्या हेमा मालिनी?
तुम्ही तिसऱ्यांदा लोकसभा निवडणूक लढवणार का? या प्रश्नावर उत्तर देताना हेमा मालिनी म्हणाल्या, “माझ्या पक्षाने जर मला निवडणूक लढवण्यासाठी तिकीट दिलं तर मी नक्कीच निवडणूक लढवेन. मात्र एक नक्की आहे की मी लोकसभा निवडणूक लढवली तर मथुरा या जागेवरुनच लढवेन, दुसऱ्या कुठल्याही जागेवरुन निवडणूक लढवणार नाही. भगवान कृष्ण यांच्याविषयी माझ्या मनात नितांत श्रद्धा आहे. श्रीकृष्णाच्या भक्तांविषयीही माझ्या मनात प्रचंड प्रेम आणि आपुलकी आहे. मी त्यांची सेवा करु इच्छिते म्हणून मी हा निर्णय घेतला आहे. तसंच मागील नऊ वर्षात मोदी सरकारने जे काम केलं आहे त्यामुळे ते तिसऱ्यांदा पंतप्रधान होतील याबाबत माझ्या मनात शंका नाही.” असंही हेमा मालिनी म्हणाल्या.
२०१४ मध्ये हेमा मालिनी यांनी केला जयंत चौधरींचा पराभव
हेमा मालिनी यांनी २०१४ आणि २०१९ अशा दोन्ही लोकसभा निवडणुकीत भाजपाच्या तिकीटावर निवडणूक लढवली आणि ती जिंकली होती. २०१४ मध्ये त्यांनी आरएलडी नेते जयंत चौधरींचा पराभव केला. हेमा मालिनी यांनी जयंत चौधरींना सुमारे ३ लाख मतांच्या फरकाने हरवलं होतं. २०१९ मध्ये हेमा मालिनी यांनी आरएलडी-सपा आघाडीचे उमेदवार नरेंद्र सिंह यांचा पराभव केला होता. या निवडणुकीत हेमा मालिनी यांना ६ लाख ६४ हजार २९१ मतं मिळाली होती तर नरेंद्र सिंह यांना ३ लाख ७६ हजार ३९९ मतं मिळाली होती.