माजी केंद्रीय मंत्री आणि काँग्रेसचे ज्येष्ठ नेते शशी थरुर नेहमी कोणत्या ना कोणत्या कारणामुळे चर्चेत असतात. कधी आपलं इंग्लिश तर कधी महिला खासदारांसोबच्या सेल्फीमुळे सोशल मीडियावर त्यांना अनेकदा ट्रोल करण्यात आलं आहे. त्यातच आता शशी थरुर यांना ट्विटरला शेअर केलेल्या फोटोमुळे ट्रोलिंगचा सामना करावा लागत आहे. कारण या सेल्फीत शशी थरुर यांनी कपड्यांवर उलटा तिरंगा लावल्याचं दिसत आहे. त्यांचा हा फोटो व्हायरल झाला असून नेटकरी टीका करत आहेत. फक्त सर्वसामान्यच नाही तर लडाखच्या भाजपा खासदारानेही या फोटोवरुन टोला लगावला आहे.
शशी थरुर यांनी ट्विटरला फोटो शेअर करताना, “इतर लोक सहभागी नसलेले सेल्फीही मी घेतले” असं म्हटलं होतं. मात्र यावेळी नेटकऱ्यांची नजर त्यांच्या जॅकेटवरील तिरंग्यावर गेली. शशी थरुर यांनी तिरंगा चुकीच्या पद्धतीने लावला होता. यानंतर नेटकऱ्यांनी त्यांना ट्रोल करण्यास सुरुवात केली.
लडाखचे भाजपा खासदार जामयांग तसेरिंग नामग्याल यांनी तर तिरंगा योग्य पद्दतीत दाखवण्यासाठी शशी थरुर यांचा उलटा फोटो ट्विटरला पोस्ट केला. ‘तिरंगा सरळ असला पाहिजे, खड्ड्यात गेली काँग्रेस’ असं कॅप्शनही त्यांनी फोटोसोबत दिलं आहे.
एका युजरने शशी थरुर यांनी तिरंगा उलटा लावण्यांचं कारण काय? अशी विचारणा केली आहे. तर सत्येंद्र नावाच्या एका व्यक्तीने साधं तिरंगा कसा लावायचा हे माहिती नाही का? अशी विचारणा करताना तिरंग्याचा अपमान केल्याबद्दल कठोर कारवाई करावी अशी मागणी केली आहे.
प्रवीण शर्मा नावाच्या युजरने शशी थरुर खासदार होण्यायोग्य नाहीत, त्यांच्यावर तिरंग्याचा अपमान केल्याप्रकरणी गुन्हा दाखल झाला पाहिजे असं म्हटलं आहे. तर एका युजरने साधं तिरंगा कसा लावायचा माहिती नसेल तर राजकारण कसं करता? असा प्रश्न विचारला आहे. देश तुम्हाला माफ करणार नाही असंही या युजरने म्हटलं आहे.
यावेळी काही युजर्सनी शशी थरुर यांच्या निमित्ताने काँग्रेस पक्षावरही निशाणा साधला आहे. विशाल गुर्जर नावाच्या युजरने ज्या व्यक्तीला तिरंग्याबद्दल माहिती नाही, त्याचा पक्ष देश कसा चालवणार? अशी विचारणा केली आहे.
शशी थरुर यांचे हे फोटो इटली दौऱ्यातील आहेत. ट्विटरला त्यांनी आपले इटलीमधील फोटो शेअर केले आहेत. यावेळी काहीजणांनी त्यांना चूक होती, माफी मागून टाका असा सल्लाही दिला आहे.