Kangana Ranaut Slam Rahul Gandhi : बॉलिवूड अभिनेत्री आणि भारतीय जनता पार्टीच्या खासदार कंगना रणौत यांनी काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांच्यावर गंभीर आरोप करत टीका केली आहे. गुरूवारी लोकसभेचे विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांच्यावर भाजपाचे खासदार प्रताप चंद्र सारंगी यांना धक्का देऊन पाडल्याचा आरोप करण्यात आला. यानंतर राहुल गांधी यांनी भाजपा खासदारांनी त्यांना अडवल्याचा तसेच धक्काबुक्की केल्याचा आरोप केला आहे.
या सर्व घटनांवर खासदार कंगना रणौत यांनी राहुल गांधी यांच्यावर गंभीर आरोप केले आहेत. “ही एक लाजिरवाणी गोष्ट आहे, आमच्या खासदारांना टाके पडले आहेत, रक्तही आले आहे. त्यांनी (काँग्रेस) डॉ. बाबासाहेब आंबेडकर किंवा संविधानाबद्दल जे खोटे पसरवले आहे, त्याचा दरवेळी भांडाफोड झाला आहे. त्यांची क्रूरता आणि हिंसा आज संसदेपर्यंत पोहोचली आहे”, असे कंगना रणौत म्हणाल्या आहेत.
यासोबतच कंगना रणौत यांनी त्यांच्या इंस्टाग्रामवरून एक स्टोरी पोस्ट केली आहे, ज्यामध्ये त्यांनी राहुल गांधींची तुलना एका जिम ट्रेनरशी केली आहे. “भाजप खासदारांवर राहुल गांधींनी आज संसदेत हल्ला केला, हा व्यक्ती संसदेत जिम ट्रेनरप्रमाणे बायसेप्स दाखवत येतो आणि आता लोकांना धक्काबुक्की आणि ठोसा द्यायला सुरुवात केलीय. राहुल गांधी हा एक कलंक आहे”, असेही कंगना रणौत यांनी त्यांच्या स्टोरीमध्ये लिहिले आहे.
नेमका वाद काय आहे?
केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी संसदेतील भाषणा दरम्यान काँग्रेसवर टीका करत असताना डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्याबद्दल विधान केले होते. अमित शाह म्हणाले होते की, “आजकाल आंबेडकरांचे नाव सारखे सारखे घेणे ही फॅशन झाली आहे. आंबेडकर, आंबेडकर, आंबेडकर असा जप काही लोक करत असतात. एवढ्या वेळा जर देवाचे नाव घेतले तर एखाद्याला स्वर्गात जागा मिळेल”,असे अमित शाह म्हणाले होते.
अमित शाह यांनी केलेल्या या विधानंतर विरोधकांकडून तीव्र निषेध व्यक्त केला जात आहे. केंद्रीय गृहमंत्र्यांनी तात्काळ राजीनामा द्यावा अशी मागणी काँग्रेसकडून करण्यात येत आहे. यादरम्यान आज इंडिया आघाडीच्या नेत्यांकडून संसद परिसरात आंदोलन करण्यात आले होते. यावेळी भाजपा आणि इंडिया आघाडीच्या नेत्यांमध्ये धक्कबुक्की झाली.