Kangana Ranaut On Farm Laws : भाजपा खासदार कंगना रणौत या पुन्हा एकदा चर्चेत आल्या आहेत. केंद्र सरकारने मागे घेतलेले तीन कृषी कायदे पुन्हा एकदा लागू करण्याची मागणी कंगना रणौत यांनी केली. कंगना रणौत यांच्या या वक्तव्यावर विरोधकांनी टिकेची झोड उठवली. कंगना रणौत यांचं शेतकऱ्यांशी संबंधित विषयावर भाष्य करण्याची ही पहिली वेळ नाही. याआधी त्यांनी महिला आंदोलकांवर पैसे घेऊन धरणे आंदोलन केल्याचा आरोप केला होता. दरम्यान, कंगना रणौत यांनी आता कृषी कायदे पुन्हा लागू करण्यासंदर्भात विधान केल्यानंतर भाजपाने स्पष्टीकरण देत कंगना रणौत यांचं हे वैयक्तिक मत असल्याचं म्हटलं. यानंतर कंगना रणौत यांनी एक्स या मायक्रोब्लॉगिंग प्लॅटफॉर्मवर एक व्हिडीओ शेअर करत कृषी कायदा परत लागू करण्यातबाबत केलेल्या विधानबाबत माफी मागितली आहे. तसेच “मी माझे शब्द मागे घेते”, असं कंगना रणौत यांनी म्हटलं आहे.
कंगना रणौत यांनी काय म्हटलं?
“काही दिवसांपासून माध्यमांनी मला कृषी कायद्यासंदर्भात प्रश्न विचारले होते. त्यावर बोलताना मी असं सुचवलं होतं की, शेतकऱ्यांनी कृषी कायदे पुन्हा आणण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना आवाहन करायला हवं. मात्र, माझ्या या विधानावर अनेक लोकांनी नाराजी व्यक्त केली. ज्यावेळी कृषी कायदे लागू करण्याचा निर्णय घेतला होता. त्यावेळी त्याला अनेक लोकांनी पाठिंबा दिला होता. मात्र, त्यानंतर अतिशय सहानुभूतीपूर्वक पंतप्रधान मोदी यांनी ते कृषी कायदे मागे घेतले होते. त्यामुळे माझ्यासह सर्वच कार्यकर्त्यांचं कर्तव्य आहे की पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या शब्दाचा मान ठेवला पाहिजे. मला देखील हे लक्षात घ्यायला हवं की, मी आता एक कलाकार नाही, तर भाजपाची एक कार्यकर्ती देखील आहे. त्यामुळे माझे मत हे माझं नसलं पाहिजे, ती माझ्या पक्षाची भूमिका असली पाहिजे. मात्र, तरी माझ्या विधानामुळे कोणी दुखावलं असेल तर मला माफ करा. मी माझे शब्द परत घेते”, असं कंगना रणौत यांनी म्हटलं आहे.
Do listen to this, I stand with my party regarding Farmers Law. Jai Hind ?? pic.twitter.com/wMcc88nlK2
— Kangana Ranaut (@KanganaTeam) September 25, 2024
भाजपा नेते गौरव भाटिया काय म्हणाले?
कंगना रणौत यांच्या विधानावर बोलताना भाजपा नेते गौरव भाटिया म्हणाले, “सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर भाजपा खासदार कंगना राणौत यांचे केंद्र सरकारने मागे घेतलेले तीन कृषी कायद्यासंदर्भातील विधान व्हायरल होत आहे. मला हे स्पष्ट करायचं आहे की, हे विधान त्यांचं वैयक्तिक विधान आहे. कंगना रणौत यांना भाजपाच्यावतीने असे विधान करण्याचा अधिकार नाही. तसेच कृषी कायद्यासंदर्भातील विधान म्हणजे भाजपाची ती भूमिका नाही”, असं भाजपा नेते गौरव भाटिया यांनी म्हटलं आहे.