पक्षबदलासाठी पैसे देण्याची ऑफर दिल्याचा दावा करणाऱ्या आम आदमी पक्षाच्या आमदारांची लाय डिटेक्टर टेस्ट केली पाहिजे, अशी मागणी दिल्लीमधील भाजपा खासदार परवेश वर्मा यांनी केली आहे. पक्षाच्या मुख्यालयात झालेल्या पत्रकार वर्मा म्हणाले, “जोपर्यंत पैशांची ऑफर देणारे कारागृहात जाणार नाहीत, तोपर्यंत आमच्या वेदना संपणार नाहीत. ते दिल्लीमधील आमदार असून, पैशांची ऑफर देणाऱ्यांचा शोध घेण्यास मदत करु”.

“त्यांच्या चार आमदारांना स्क्रिप्ट देण्यात आली आहे. कधी ते माजी खासदाराने तर, कधी माजी आमदाराने ऑफर दिल्याचं सांगतात. त्यामुळे दिल्ली पोलिसांनी त्यांच्या घरांमधील सीसीटीव्ही आणि त्यांचे मोबाइल तपासावेत जेणेकरुन सत्य समोर येईल,” असंही परवेश वर्मा यांनी म्हटलं आहे.

“त्यांची लाय डिटेक्टर आणि नार्को टेस्ट झाली पाहिजे. कारण नार्को टेस्टमध्ये तुम्ही विसरला असलात तरी काय झालं होतं हे सांगू शकता,” असं वर्मा यांनी सांगितलं.

‘आप’च्या तीन आमदारांवर कारवाई?; कथित खोटय़ा आरोपांबद्दल दिल्लीचे नायब राज्यपाल आक्रमक भूमिकेत

याआधी दिल्लीमधील भाजपाच्या सर्व सात खासदारांनी नायब राज्यपाल व्ही के सक्सेना यांना यांनी पत्र लिहिलं होतं. मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल आणि उपमुख्यमंत्री मनिष सिसोदिया यांनी ‘आप’च्या आमदारांना भाजपात प्रवेश करण्यासाठी २० कोटींची ऑफर देण्यात आल्याचा आरोप केला असून, त्याची चौकशी करण्याची मागणी त्यांनी या पत्रातून केली होती.

अरविंद केजरीवाल यांच्या नेतृत्वाखाली सर्व आमदार राजघाटवर पोहोचले होते. यावेळी त्यांनी ‘देशाला भाजपाच्या ऑपरेशन लोटसपासून वाचवा’ अशी प्रार्थना केली.