PM Modi Rebirth of Chhatrapati Shivaji Maharaj: लोकसभा निवडणुकीदरम्यान खुद्द पंतप्रधान नरेंद्र मोदींनी आपला जन्म झाला नसून आपल्याला देवानंच पाठवल्याचा दावा करणारं विधान केलं होतं. यावरून विरोधकांनी मोठी टीका-टिप्पणी केली होती. लोकसभा आणि त्यापाठोपाठ महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीतही हा मुद्दा चांगलाच चर्चेत आला होता. यानंतर आता भाजपा खासदारानं थेट लोकसभेत बोलताना केलेल्या विधानावरून टीका होत आहे. मोदी पूर्वजन्मात छत्रपती शिवाजी महाराज होते, असा दावा त्यांनी केला आहे!

भाजपाचे ओडिशातील खासदार प्रदीप पुरोहित यांनी मंगळवारी लोकसभेत बोलताना हे विधान केल्यानंतर त्यावरून विरोधकांनी आगपाखड सुरू केली आहे. त्याचबरोबर नेटिझन्सकडूनही प्रदीप पुरोहित यांच्यावर टीका-टिप्पणी केली जात आहे. भारतीय जनता पक्षानं या विधानाबद्दल माफी मागायला हवी, अशी मागणीही विरोधकांकडून केली जात आहे.

काय म्हणाले प्रदीप पुरोहित?

सोशल मीडियावर लोकसभेतील पुरोहित यांच्या विधानाचा व्हिडीओ व्हायरल होत आहे. “देशाला एक शक्तिशाली राष्ट्र बनवण्याचा संकल्प पंतप्रधान नरेंद्र मोदींनी केला आहे. माझ्या बारगढ मतदारसंघात गिरीजा बाबा नावाचे एक संत राहतात. त्यांनी मला एक दिवस बोलताना सांगितलं की देशाचे विद्यमान पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा पूर्वजन्म हा छत्रपती शिवाजी महाराज यांचा होता. त्यांचा दुसरा जन्म मोदी आहे. त्यामुळे या देशाला जगात सर्वात शक्तिशाली राष्ट्र करण्याच्या हेतूने ते काम करत आहेत”, असं विधान पुरोहित यांनी केलं.

नेटिझन्समध्ये संताप

दरम्यान, पुरोहित यांच्या विधानाचे तीव्र पडसाद विरोधकांप्रमाणेच नेटिझन्समध्ये उमटल्याचं पाहायला मिळत आहे. हा छत्रपती शिवाजी महाराजांचा अवमान असल्याचा दावा काही नेटिझन्सनं केला आहे. तसेच, मोदींची शिवाजी महाराजांशी तुलना करणं अयोग्य असल्याचीही प्रतिक्रिया नेटिझन्स व्यक्त करत आहेत.

काँग्रेसची आगपाखड

काँग्रेस खासदार वर्षा गायकवाड यांनी या विधानावरून टीका केली आहे. “अखंड हिंदुस्तानाचे आराध्य दैवत आणि रयतेचे राजे छत्रपती शिवाजी महाराज यांचा वारंवार अपमान करण्याचे आणि महाराष्ट्रातील तसेच जगभरातील शिवप्रेमींची अस्मिता दुखावण्याचे नियोजनबद्ध कारस्थान भाजपच्या नेतेमंडळींकडून केले जात आहे. या लोकांनी छत्रपती शिवाजी महाराजांचा मानाचा जिरेटोप नरेंद्र मोदी यांच्या डोक्यावर ठेवून शिवरायांचा घोर अपमान केला. आणि आता या भाजपा खासदाराचे हे घृणास्पद वक्तव्य ऐका”, अशी पोस्ट करत वर्षा गायकवाड यांनी लोकसभेतील व्हिडीओ शेअर केला आहे.