राष्ट्रीय लोकशाही आघाडीने (एनडीए) देशात तिसऱ्यांदा सरकार स्थापन केलं असून १८ व्या लोकसभेचं पहिलं अधिवेशन कालपासून (२४ जून) सुरू झालं आहे. अधिवेशनाच्या पहिल्या दिवशी सर्व खासदारांचा शपथविधी पार पडला. खासदारांनी हिंदीसह इतर भाषांमध्ये खासदारकीची शपथ घेतली. दरम्यान, भाजपाच्या एका खासदाराने घेतलेल्या शपथेची मोठ्या प्रमाणात चर्चा होत आहे. राज भूषण चौधरी असं या खासदाराचं नाव आहे. जलशक्ती राज्य मंत्री असलेल्या डॉ. राज भूषण चौधरी यांनी सोमवारी लोकसभेत इतर खासदारांप्रमाणे ईश्वराचं स्मरण करून शपथ घेण्याऐवजी ‘सत्यनिष्ठा प्रतिज्ञा’ केली. राज भूषण यांची शपथ ऐकून भाजपाचे इतर खासदार आश्चर्यचकित झाले होते.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

बिहारच्या मुजफ्फरपूरचे खासदार राज भूषण चौधरी हे भाजपाचे एकमेव खासदार आहेत ज्यांनी त्यांच्या शपथेमध्ये ईश्वराचा उल्लेख केला नाही. संसदेच्या नियमानुसार खासदार ईश्वराचं स्मरण करून (ईश्वरसाक्ष) शपथ घेऊ शकतात. तसेच ‘सत्यनिष्ठेची प्रतिज्ञा’ करू शकतात. “ईश्वराला स्मरून कायद्याद्वारे स्थापित भारताच्या संविधानाप्रती खरी श्रद्धा आणि निष्ठा राखू” अशा पद्धतीची शपथ खासदार घेतात. दरम्यान, राज भूषण यांनी शपथ घेतल्यानंतर धिम्या आवाजात चर्चा चालू होती की चौधरी यांनी एका समाजवादी (कम्युनिस्ट) नेत्याप्रमाणे शपथ घेतली. बहुसंख्य समाजवादी नेते त्यांच्या शपथेत ईश्वराचा उल्लेख करत नाहीत. ते सत्यनिष्ठेची प्रतिज्ञा करतात.

भारतीय जनता पार्टी ही स्थापनेपासूनच नेहमी हिंदू धर्म, हिंदुत्व आणि सनातन धर्माविषयी अग्रही भूमिका मांडत आली आहे. अयोध्येतील श्रीरामाचं मंदिर हे गेल्या अनेक दशकांपासून भाजपाच्या राजकारणाच्या केंद्रस्थानी आहे. अशा पक्षाच्या खासदाराने ईश्वराचं स्मरण न करता शपथ घेतल्याने अनेकांच्या भुवया उंचावल्या होत्या.

हे ही वाचा >> Atishi Hunger Strike : दिल्लीच्या जलमंत्री आतिशी यांची प्रकृती खालावली, शुगर लेव्हल कमी झाल्याने रुग्णालयात दाखल!

नव्या, सरकारमध्ये एकूण ७२ मंत्र्यांचा समावेश आहे. यामध्ये बिहारच्या मुजफ्फरपूरचे खासदार राज भूषण चौधरी यांचाही समावेश आहे. मोदींच्या तिसऱ्या मंत्रिमंडळात त्यांना राज्यमंत्रिपद देण्यात आलं आहे. ४६ वर्षीय डॉ. राज भूषण चौधरी यांनी काँग्रेसचे उमेदवार अजय निषाद यांचा तब्बल २,३४,९२७ मतांनी पराभव केला आहे. निवडणूक आयोगाने दिलेल्या माहितीनुसार मुजफ्फरपूर लोकसभेत राज भूषण यांना ६,१९,७४९ मतं मिळाली आहेत. तर अजय निषाद यांना ३,८४,८२२ मतं मिळाली. राज भूषण हे बिहारमधील सर्वाधिक मताधिक्याने जिंकलेले खासदार आहेत. बिहारमध्ये इतर कुठलाही भाजपा खासदार २ लाखांहून अधिक मताधिक्क्याने जिंकलेला नाही.

मराठीतील सर्व देश-विदेश बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Bjp mp raj bhushan choudhary took oath without mentioning god asc