भाजपा खासदार साध्वी प्रज्ञा सिंह ठाकूर (sadhvi pragya singh thakur) यांना जीवे मारण्याची धमकी देण्यात आली आहे. या प्रकरणी पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली असून पोलीस धमकी देणाऱ्या व्यक्तीचा शोध घेत आहेत. ‘मी इक्बाल कासकरचा माणूस बोलतोय असे सांगत लवकरच तुला मारले जाईल’ अशी धमकी प्रज्ञा ठाकूर यांना फोनवरुन देण्यात आली आहे.

दाऊदचा माणूस असल्याचा तक्रारीत उल्लेख

भोपळमधील टीटी नगर पोलीस ठाण्यात प्रज्ञा ठाकूर यांनी तक्रार दाखल केली आहे. तसेच फोन करणाऱ्या व्यक्तीने आपण दाऊद इब्राहिमचा भाऊ इक्बाल कारसचा माणूस अल्याची ओळख सांगितल्याचे तक्रारीत म्हणटले आहे. तसेच या घटनेवेळी साध्वी यांच्यासोबत उपस्थित असलेल्या लोकांनी या संभाषणाचा व्हिडिओदेखील रेकॉर्ड केला आहे. सध्या हा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. प्रज्ञा ठाकूर यांना आलेला धमकीचा फोन नेमका कुठून आला याबाबत माहिती मिळाली नसून तपास सुरु असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे.

या अगोदरही देण्यात आल्या आहेत धमक्या

व्हिडिओ रेकॉर्डिंग पाहिल्यानंतर पोलिसांनी कलम ५०६ आणि ५०७ अन्वये गुन्हा दाखल केला आहे. प्रज्ञा ठाकूर यांना जीवे मारण्याची धमकी देणारा हा पहिला फोन नाही. खासदार झाल्यानंतर प्रज्ञा ठाकूर यांना अनोळखी नंबरवरून धमकीचे मेसेज आणि फोन आले आहेत. काही दिवसांपूर्वी भाजपाच्या निलंबित प्रवक्त्या नुपूर शर्मा यांनी प्रेषित महोम्मद यांच्यावर आक्षेपार्ह विधान केले होते. या विधानाचा देशासोबत परदेशातूनही विरोध करण्यात आला होता. मात्र, प्रज्ञा ठाकूर यांनी या विधानाचे समर्थन करत भारत हा हिंदूंचा देश असल्याचे म्हणले होते. पाखंड्यांनी नेहमीच हिंदू देवी-देवतांचा अपमान केल्याचा आरोप ठाकूर यांनी केला होता.