देशभरात महागाईमुळे सामान्यांचं आर्थिक गणित कोलमडलं असून त्यासाठी केंद्र सरकार जबाबदार असल्याची टीका सातत्याने विरोधक करत आहेत. काँग्रेसकडून वारंवार देशातील वाढत्या महागाईसाठी केंद्राला जबाबदार धरण्यात येत आहे. पण आता खुद्द केंद्रातील सत्ताधारी भाजपाचे खासदारच केंद्राच्या कार्यपद्धतीवर आणि त्यांच्या निर्णयक्षमतेवर प्रश्नचिन्ह उपस्थित करू लागले आहेत. भाजपा खासदार सुब्रह्मण्यम स्वामी यांनी केंद्रातील भाजपा सरकारवर, विशेषत: पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांच्यावर निशाणा साधतानाच महागाईसाठी आर्थिक धोरणांना कारणीभूत ठरवलं आहे. त्यांच्या या टीकेनंतर नवी चर्चा सुरू झाली असून मनीकंट्रोलनं यासंदर्भातलं वृत्त दिलं आहे.
महागाईसाठी केंद्रीय अर्थमंत्री जबाबदार
सुब्रह्मण्यम स्वामी यांनी देशातील महागाईसाठी केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांना जबाबदार धरलं आहे. “देशातल्या महागाईसाठी केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारमण जबाबदार आहेत. त्या कुणाशीही सल्लामसलत करत नाहीत”, असं सुब्रह्मण्यम स्वामी म्हणाले आहेत.
त्यांना अर्थशास्त्र कळत नाही
दरम्यान, केंद्रीय अर्थमंत्र्यांसोबतच स्वामी यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर देखील निशाणा साधला आहे. “सरकारला अर्थशास्त्र कळत नाही. पंतप्रधान नरेंद्र मोदींनाही आणि केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांनाही अर्थशास्त्र कळत नाही. अगदी विकासदर कमी देखील होत असेल, तर त्यांना हे कळत नाही की काय करायला हवं”, असं स्वामी म्हणाले.
मंदिर-मशिद वादावर निशाणा
यावेळी स्वामी यांनी देशातील काही ठिकाणी मशिदींच्या ऐवजी मंदिरं असायला हवी होती, या हिंदुत्ववाद्यांच्या मागणीवर देखील बोट ठेवलं आहे. “केंद्रानं अजूनही प्रार्थनास्थळ कायदा १९९१मध्ये सुधारणा करण्याच्या आपल्या याचिकेवर अद्याप केंद्रानं उत्तर दिलेलं नाही”, असं ते म्हणाले. या या कायद्यानुसार कोणत्याही प्रार्थनास्थळाच्या १५ ऑगस्ट १९४७ रोजी असलेल्या स्वरूपामध्ये बदल करण्यासाठी किंवा ते ताब्यात घेण्यासाठी याचिका दाखल करण्यास मज्जाव करण्याची सुधारणा सुचवण्यात आली आहे.