भाजपाचे वादग्रस्त राज्यसभा खासदार सुब्रमण्यम स्वामी यांनी आता केंद्रीय अर्थ सचिव हसमुख अधिया यांच्याविरोधात मोहीम उघडली आहे. अधिया हे भ्रष्ट असल्याचा गंभीर आरोप त्यांनी केला आहे. अधिया हे सोनिया गांधी आणि माजी अर्थमंत्री पी चिदंबरम यांना वाचवण्याचा प्रयत्न करत असल्याचा दावाही त्यांनी केला. यासंबंधी त्यांनी केंद्रीय अर्थमंत्री अरुण जेटली यांना पत्र लिहून अर्थ सचिव हसमुख अधिया यांच्याविरोधात भ्रष्टाचार निवारण अधिनियम १९ अंतर्गत हसमुख अधिया यांच्याविरोधात कारवाई करण्याची मागणी केली आहे.

स्वामी यांनी आपल्या पत्रात अधिया यांच्याविरोधातील भ्रष्टाचाराच्या अनेक प्रकरणांचा उल्लेख केला आहे. अधिया हे सोनिया गांधी आणि चिदंबरम यांच्याविरोधातील भ्रष्टाचाराचा तपास करणाऱ्या अधिकाऱ्यांची जाणूनबुजून बदली केली जात आहे. त्यांना वाचवण्यासाठी हा प्रकार सुरु असल्याचे स्वामी यांनी म्हटले आहे.

स्वामी यांनी जेटली यांना लिहिलेल्या पत्रात एका वेबसाइटवर प्रसिद्ध झालेल्या बातमीचा उल्लेख केला आहे. पीएनबी घोटाळ्यातील मुख्य आरोपी नीरव मोदीने आपल्याविरोधात चौकशी होऊ नये म्हणून अर्थ सचिव अधिया यांना भेट स्वरूपात सोन्याची बिस्किटे आणि अनेक महागड्या वस्तू दिल्या आहेत. अधिया यांनी त्याला पळून जाण्यास मदत केल्याचा आरोपही त्यांनी केला.

‘एएनआय’शी बोलताना ते म्हणाले की, अर्थ सचिव हसमुख अधिया यांच्याविरोधात खटला सुरु करण्यासाठी मी अर्थ मंत्र्यांना पत्र लिहिले आहे. भ्रष्टाचाराच्या अनेक प्रकरणात अधिया यांचा सहभाग आहे. त्याचा उल्लेख मी माझ्या पत्रात केला आहे.

दरम्यान, हसमुख अधिया हे गुजरात केडरचे १९८१ च्या बॅचचे आयएएस अधिकारी आहेत. मोदी सरकारने नोव्हेंबर २०१४ मध्ये त्यांची अर्थ मंत्रालयात सचिवपदी नियुक्ती केली होती. सप्टेंबर २०१५ मध्ये त्यांनी महसूल सचिव करण्यात आले. तर मागील वर्षी नोव्हेंबर २०१७ मध्ये मुख्य अर्थ सचिव म्हणून नेमण्यात आले.

Story img Loader