Tejasvi Surya on INDIA: देशामध्ये २०२४ या वर्षी लोकसभेची निवडणूक पार पडणार आहे. यासाठी सर्वच राजकीय पक्ष आतापासूनच तयारीला लागले आहेत. सध्या केंद्रामध्ये पंतप्रधान नरेंद मोदींच्या नेतृत्वात भाजपा (NDA) चे सरकार आहे. २०२४ च्या निवडणुकीत भाजपाला पराभूत करण्यासाठी विरोधी पक्ष एकत्रित आले आहेत. यासाठी सर्व विरोधी पक्षांनी आघाडी स्थापन केली आहे. विरोधी पक्षांनी त्यांच्या आघाडीला ‘इंडिया’ असे नाव दिले आहे. याच ‘इंडिया’ आघाडीवर भारतीय जनता पक्षाचे खासदार आणि भाजपा युवा मोर्चाचे राष्ट्रीय अध्यक्ष तेजस्वी सूर्या यांनी टीका केली.
खासदार तेजस्वी सूर्या यांनी सोमवारी नर्मदापूरमध्ये पत्रकारांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी विरोधी पक्षांच्या आघाडीचा उल्लेख ”हे तर साप अन् मुंगुसाने एकत्र येण्यासारखे आहे” असा केला आहे. ”इंडिया’ आघाडी तयार होण्याआधी विरोधी पक्ष छुप्या पद्धतीने तसेच धर्मनिरपेक्षतेचा बुरखा परिधान करून हिंदूंच्या व भारताच्या विरोधात राजकारण करायचे. मात्र आज ते उघडपणे सनातन संस्कृती आणि सनातन धर्माच्या विरोधात बोलत आहेत” असे वक्तव्य तेजस्वी सूर्या यांनी नर्मदापूरम येथे पत्रकारांशी संवाद साधताना केले.
हेही वाचा : “माझ्या बहिणींनो तुम्हाला…”, मुख्यमंत्री शिवराज चौहान यांची महिला मतदारांना भावनिक साद
तेजस्वी सूर्या पुढे म्हणाले, ‘इंडिया’ आघाडी सनातन धर्म नष्ट करण्यासाठी तयार करण्यात आली आली होती असे DMK पक्षाचे म्हणणे होते. तामिळनाडूचे मुख्यमंत्री एम. के. स्टॅलिन यांचे पुत्र उदयनिधी यांनी २ सप्टेंबर रोजी ”सनातन धर्माचा समूळ नाश करणे म्हणजेच मानवता होय” असे वादग्रस्त विधान केले होते.
उदयनिधी यांनी सनातन धर्माची तुलना ही डेंग्यू, मलेरिया किंवा करोना यांसारख्या आजारांशी केली होती. सनातन धर्माविषयी बोलताना ते म्हणाले, ”काही गोष्टींचा विरोध केला जाऊ शकत नाही, तर त्या गोष्टींचा केवळ तिरस्कारच केला जाऊ शकतो. जसे की डेंग्यू, मलेरिया किंवा करोना अशा आजारांचा आपण विरोध करू शकत नाही कारण आपल्याला त्यांचा नाश करायचा आहे. तसेच सनातन संस्कृती आणि धर्माला विरोध करण्यापेक्षा त्याला संपवले पाहिजे.”