संसदेच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनादरम्यान लोकसभेत आधी राहुल गांधी आणि नंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलेल्या भाषणावरून सध्या देशातलं राजकीय वातावरण चांगलंच तापलं आहे. एक गट राहुल गांधींच्या भाषणाचं कौतुक करत असताना दुसरा गट मात्र पंतप्रधानांनी काँग्रेसवर केलेल्या टीकेचं समर्थन करत आहे. या पार्श्वभूमीवर भाजपा खासदार तेजस्वी सूर्या यांनी राहुल गांधींवर खोचक शब्दांमध्ये निशाणा साधला आहे.
भाजपाचे बंगळुरूमधील खासदार तेजस्वी सूर्या यांनी राहुल गांधींच्या परराष्ट्र धोरणाविषयीच्या भूमिकेवर टीका केली. “राहुल गांधींचं परराष्ट्र धोरणाविषयीचं ज्ञान हे फक्त त्यांच्या विदेशात जाणाऱ्या सुट्टीपुरतंच मर्यादित आहे. जेव्हा ते अशा फिरस्तीवर नसतात, तेव्हाच ते संसदेत येतात. केंद्र सरकारला परराष्ट्र धोरणाविषयी सल्ला देण्याचा त्यांना काहीही अधिकार नाही”, असं तेजस्वी सूर्या म्हणाले आहेत. दिल्लीमध्ये पत्रकारांशी बोलताना त्यांनी देशातील राजकीय चर्चेवर भूमिका मांडली आहे.
काय म्हणाले राहुल गांधी?
राहुल गांधी यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या परराष्ट्र धोरणावर निशाणा साधला होता. “पंतप्रधान नरेंद्र मोदींचं परराष्ट्र धोरण दिवाळखोरीचं आहे. त्यामुळे मोदी भारताला संकटात टाकत आहेत. सध्याचं केंद्रातलं सरकार पाकिस्तान आणि चीनला एकत्र येण्याची संधी देत आहे. परराष्ट्र मंत्र्यांना त्यांचं काम व्यवस्थित माहिती नाही”, असं राहुल गांधी म्हणाले.
“चीन आणि पाकिस्तानकडून आपल्याला धोका आहे आणि हा एक गंभीर मुद्दा आहे. हा विनोद नाही. या देशाला कमकुवत केलं जात आहे. पंतप्रधानांनी याविषयी (आपल्या भाषणात) काहीही म्हटलेलं नाही”, असं देखील राहुल गांधी म्हणाले होते.
परराष्ट्रमंत्र्यांचं राहुल गांधींना प्रत्युत्तर!
दरम्यान, राहुल गांधींच्या या वक्तव्यानंतर परराष्ट्र मंत्री एस. जयशंकर यांनी त्याला प्रत्युत्तर दिलं आहे. “१९६३मध्ये पाकिस्ताननं अवैधरीत्या शाक्सगाम खोरं चीनला देऊन टाकलं. चीननं १९७०मध्ये पाकव्याप्त काश्मीरमधून जाणारा काराकोरम महामार्ग बांधला. २०१३मध्ये चीन-पाकिस्तान इकोनॉमिक कॉरिडॉर सुरू झाला. त्यामुळे तुम्ही स्वत:लाच प्रश्न विचारा की तेव्हा चीन आणि पाकिस्तान एकमेकांपासून वेगळे होते का?” असा सवाल जयशंकर यांनी राहुल गांधींना विचारला आहे.