भाजपा खासदार वरुण गांधी यांनी पुन्हा एकदा आपल्याच पक्षावर हल्लाबोल केला आहे. मंगळवारी सकाळी त्यांनी बॅंक आणि रेल्वेच्या खासगीकरणावर चिंता व्यक्त केली. सरकारच्या या निर्णयामुळे अनेकांच्या नोकऱ्या जाणार आहेत, असे वरुण गांधी यांनी म्हटले आहे. पीलीभीतचे खासदार वरुण गांधी अनेकदा आपल्या प्रश्नांवरून भाजपाला घेरतात.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

 “केवळ बँका आणि रेल्वेचे खाजगीकरण केल्याने पाच लाख कर्मचारी बळजबरीने सेवानिवृत्त म्हणजेच बेरोजगार होतील. प्रत्येकाचे काम संपल्याने लाखो कुटुंबांच्या आशा संपत आहेत. सामाजिक स्तरावर आर्थिक विषमता निर्माण करून ‘लोककल्याणकारी सरकार’ कधीही भांडवलशाहीला चालना देऊ शकत नाही,” असे वरुण गांधी यांनी आपल्या ट्विटमध्ये म्हटले आहे.

याआधीही राहुल गांधींसह अनेक विरोधी पक्षनेत्यांनी खाजगीकरणावरुन भाजपा सरकारला घेरले आहेत. भारताचे रेल्वेचे जाळे हे जगातील सर्वात मोठे रेल्वेपैकी आहे. भारतीय रेल्वे १३ लाखांहून अधिक लोकांना रोजगार देते. गेल्या वर्षी जेव्हा आणखी प्रश्न उपस्थित केले गेले तेव्हा माजी रेल्वेमंत्री पीयूष गोयल यांनी रेल्वेचे कधीही खाजगीकरण होणार नाही, असे म्हटले होते.

सरकारच्या दोन सार्वजनिक क्षेत्रातील बँकांच्या खाजगीकरणालाही विरोधकांनी विरोध दर्शवला होता. माजी पंतप्रधान इंदिरा गांधी यांनी १४ बँकांचे राष्ट्रीयीकरण केले, असे काँग्रेसने म्हटले आहे. मात्र हे सरकार एक एक करून विलीनीकरण करत आहे. त्यामुळे गरिबांना बँकांचा लाभ मिळणार नाही. काही मोजक्याच लोकांना बँकांचा लाभ मिळावा म्हणून हे काम केले जात आहे, असे काँग्रेसने म्हटले आहे.

दरम्यान, वरुण गांधी गेल्या काही काळापासून आपल्याच सरकारवर सतत हल्लाबोल करत आहेत. शेतकरी आंदोलनादरम्यान लखीमपूर खेरीमध्ये हिंसाचार उसळला तेव्हा त्यांनी सरकारला घेराव घातला. काही दिवसांपूर्वीच, देशातील सर्वात मोठ्या आर्थिक फसवणुकीच्या प्रकरणांपैकी एक असलेल्या एबीजी शिपयार्ड बँकेच्या फसवणुकीवरून त्यांनी सरकारवर निशाणा साधला होता.  “विजय मल्ल्या: ९००० कोटी, नीरव मोदी: १४००० कोटी, ऋषी अग्रवाल: २३००० कोटी. आज जेव्हा देशात कर्जाच्या ओझ्याखाली दररोज सुमारे १४ लोक आत्महत्या करत आहेत, तेव्हा अशा श्रीमंत प्राण्यांचे जीवन वैभवाच्या शिखरावर असते. या अति भ्रष्ट व्यवस्थेवर ‘मजबूत सरकारने’ ‘सशक्त कारवाई’ करणे अपेक्षित आहे,” असे वरुण गांधी यांनी आपल्या ट्विटमध्ये म्हटले होते.

मराठीतील सर्व देश-विदेश बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Bjp mp varun gandhi attack on modi government over privatization abn