भाजपाचे खासदार वरुण गांधी यांनी लखीमपूर हिंसाचारावरुन पुन्हा एकदा गंभीर आरोप केलाय. लखीमपूरमध्ये हिंसाचाराची घटना घडल्यानंतर तेथे हिंदू विरुद्ध शिख असा वाद निर्माण करण्याचा प्रयत्न केल्याचा आरोप वरुण गांधी यांनी केलाय. त्यामुळे हा उत्तर प्रदेशमधील योगी आदित्यनाथ सरकारला घरचा आहेर असल्याचं मानलं जातंय. वरुण गांधी यांनी एक ट्विट करत आपली भूमिका मांडली. यात त्यांनी क्षुद्र राजकीय फायद्याला राष्ट्रीय एकतेपेक्षा अधिक महत्त्व देऊ नका, असा सल्लाही दिलाय.

वरुण गांधी म्हणाले, “लखीमपूरमधील घटनेला हिंदू विरुद्ध शिख अशा वादात रुपांतरीत करण्याचा प्रयत्न करण्यात आला. हे केवळ अनैतिक आणि चुकीचं नसून ही विभागणी धोकादायक आहे. ज्या जखमा भरायला अनेक पीढ्या लागल्या त्या पुन्हा करणं धोकादायक आहे. आपण क्षुद्र राजकीय फायद्याला राष्ट्रीय एकतेपेक्षा अधिक महत्त्व द्यायला नको.”

वरुण गांधी यांनी वेळोवेळी लखीमपूर खेरी हिंसाचार प्रकरणात भूमिका घेतल्याचं पाहायला मिळालंय. याआधी त्यांनी आंदोलक शेतकऱ्यांवर केंद्रीय गृह राज्यमंत्री अजय मिश्रा यांच्या मुलाची महिंद्रा थार गाडी शेतकऱ्यांना चिरडतानाचा व्हिडीओ देखील ट्विट केला होता.

हेही वाचा : वरुण गांधींचं शेतकऱ्यांसाठी योगी आदित्यनाथांना पत्र, दुसरीकडे ३६ शेतकऱ्यांवरच FIR

दरम्यान, भाजपाचे पीलीभीत खासदार वरुण गांधी यांनी उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्याकडे ऊसाचे दर वाढवून प्रति क्विंटल ४०० रुपये करण्याचं आवाहन केलं आहे. याआधी १२ सप्टेंबर रोजी देखील वरुण गांधी यांनी मुख्यमंत्र्यांना पत्र लिहून उसाच्या किंमतीत वाढ करण्याची मागणी केली होती. याच पार्श्वभूमीवर, उसाच्या दरात २५ रुपये प्रति क्विंटल वाढ केल्याबद्दल खासदारांनी मुख्यमंत्र्यांचे आभार मानले आहेत. तर दुसरीकडे काहीच दिवसांपूर्वी वरुण गांधी यांना काळे झेंडे दाखवल्याबद्दल ३६ शेतकऱ्यांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

उत्तर प्रदेश सरकारने रविवारी केंद्र आणि राज्य सरकारच्या शेतकऱ्यांच्या बाजूने राबवलेल्या योजनांवर चर्चा करताना उसाच्या दरात २५ रुपये प्रति क्विंटल वाढ करण्याची घोषणा केली आहे. सोमवारी मुख्यमंत्र्यांना पाठवलेल्या पत्रात वरुण गांधी म्हणाले की, “तुमच्या सरकारने उत्तर प्रदेशातील आगामी ऊस गळीत हंगाम २०२१-२२ साठी ऊस दरात २५ रुपये प्रति क्विंटल वाढ केली आहे. या वाढीसाठी तुमचे आभार. मी विनंती करू इच्छितो की, ऊस उत्पादक शेतकरी तुमच्याकडून अधिक भाववाढीची अपेक्षा करत आहेत.”

Story img Loader