दादरी येथे मुस्लिम नागरिकाची घरात गोमांस ठेवल्याच्या संशयावरून हत्या केल्याच्या प्रकरणानंतर येथील हिंदू नागरिकांच्या जिवाला धोका निर्माण झाल्याचा दावा करीत येथील हिंदूंना हवी ती सुरक्षा पुरविण्यासाठी आमची संघटना तत्पर असून गरज पडल्यास दादरीतील हिंदूंना बंदुकांचेही वापट करण्यात येईल, असा वादग्रस्त पवित्रा ‘हिंदू युवा वाहिनी’ संघटनेने घेतला आहे.
‘हिंदू युवा वाहिनी’ ही संघटना भाजपचे खासदार योगी आदित्यनाथ यांच्या मार्गदर्शनाखाली चालवली जाते. त्यामुळे वादग्रस्त वक्तव्यांमुळे नेहमी चर्चेत असणारे योगी आदित्यनाथ यांच्या संघटनेच्या या नव्या पावित्र्यामुळे ते पुन्हा एकदा वादाच्या भोवऱयात सापडले आहेत.

दादरी प्रकरणामुळे वातावरण तापलेले असल्यामुळे पोलिसांनी सुरक्षेच्या कारणास्तव ‘हिंदू युवा वाहिनी’चे सदस्यांना गावात प्रवेश नाकारला. यावर संघटनेचे सदस्य जितेंद्र त्यागी यांनी संताप व्यक्त केला. दादरी प्रकरणामुळे गावातील हिंदूंचा छळ केला जात असल्याचा आरोप त्यागी यांनी यावेळी केला. आम्ही गावातील प्रत्येक हिंदू नागरिकाची भेट घेऊन त्यांना शक्य ती सर्व सुरक्षा देऊ आणि गरज पडल्यास त्यांना स्व:रक्षणासाठी बंदुका देखील देऊ, असे विधान जितेंद्र त्यांनी यावेळी केले. तसेच महंमद अखलाखच्या मृत्यूवर त्यागी यांनी यावेळी दु:ख व्यक्त केले आणि याप्रकरणाच्या सीबीआय चौकशीची मागणी केली.

Story img Loader