पश्चिम बंगाल सरकारविरोधात भाजपाने आक्रमक पवित्रा धारण केला आहे. भाजपाने तृणमूल काँग्रेसविरुद्ध ‘चलो नबन्ना’ मोर्चाचे आयोजन केलं आहे. या मोर्चात भाजपाच्या असंख्य कार्यकर्त्यांनी सहभाग घेतला. मात्र, पोलिसांनी या कार्यकर्त्यांना अडवण्याचा प्रयत्न केला. त्यामुळे भाजपा कार्यकर्ते आणि पोलिसांमध्ये वाद झाल्याचं पहायला मिळतं आहे.
पश्चिम बंगालमधील ममता बॅनर्जी सरकारमधील भ्रष्टाचाराविरोधात भाजपाने ‘चलो नबन्ना’ मोर्चाचं आयोजन केलं आहे. या मोर्चात सहभागी होण्यासाठी भाजपाने कार्यकर्त्यांना कोलकात्यात येण्याचं आवाहन केलेलं. त्यासाठी भाजपाचे कार्यकर्ते राणीगंज रेल्वे स्थानकाकडे निघाले होते. पण, मोर्चाला परवानगी नसल्याने पोलीस आणि कार्यकर्त्यांमध्ये झटापट झाली.
तसेच, हावडा पुलाजवळ पोलिसांनी आंदोलकांना पांगवण्यासाठी अश्रुधुराचा आणि पाण्याचा मारा केला आहे. काही ठिकाणी आंदोलकांनी सार्वजनिक वाहनांना आग लावल्याच्या घटनाही समोर आल्या आहेत. पोलिसांनी अनेक भाजपा कार्यकर्त्यांना ताब्यातही घेतलं आहे.
“पोलिसांना किंमत चुकवावी लागणार”
दरम्यान, भाजपाचे नेते सुवेंदू अधिकारी यांना पोलिसांनी अटक केली आहे. त्यापूर्वी बोलताना अधिकारी यांनी ममता बॅनर्जी सरकारवर हल्लाबोल केला आहे. “मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांना आपल्या समर्थकांचा पाठिंबा नाही आहे. त्यामुळे त्या बंगालमध्ये उत्तर कोरियासारखी हुकूमशाही राबवत आहेत. पोलीस जे करत आहेत, त्याची मोठी किंमत त्यांना चुकवावी लागले. पश्चिम बंगालमध्ये भाजपाचे सरकार येणार आहे,” असा इशाराही अधिकारी यांनी दिला आहे.