नमो टीव्हीवर दाखवल्या जाणाऱ्या कार्यक्रमातील आशयाची पूर्वतपासणी करून घेतली पाहिजे, असा आदेश निवडणूक आयोगाने दिल्यानंतर आता दोन दिवसांनी दिल्लीच्या मुख्य निवडणूक अधिकाऱ्यांनीही तपासल्याशिवाय कुठलेही कार्यक्रम दाखवू नयेत असे म्हटले आहे. प्रतिबंधात्मक उपाय म्हणून नमो टीव्ही बघून त्यावरील कार्यक्रमावर देखरेख करण्यासाठी अधिकाऱ्यांची नेमणूक करण्यात आली आहे.
गुरूवारी निवडणूक आयोगाने असे म्हटले होते,की नमो टीव्ही हा भाजप प्रायोजित आहे. त्यात सर्व संकलित कार्यक्रम दाखवले जातात, पण ते दाखवण्यापूर्वी त्यांचे प्रमाणन करून घेणे आवश्यक आहे. दिल्लीतील माध्यम व देखरेख समितीकडून हा आशय तपासून घ्यावा. निवडणूक आयोगाच्या या आदेशानंतर दिल्लीच्या मुख्य निवडणूक अधिकाऱ्यांनी भाजपला पत्र पाठवले असून जे कार्यक्रम प्रमाणित केलेले नाहीत ते दाखवण्यात येऊ नयेत.
राजकीय पक्ष सर्वसाधारणपणे ध्वनी-चित्र-आशय हा पूर्वतपासणीसाठी पाठवत असतात. त्यात ते कार्यक्रम कुठल्या वाहिनीवर किंवा मंचावर दाखवले जाणार आहेत याचा उल्लेख नसतो. हा आशय एखाद्या प्रचार सभेतही दाखवला जाऊ शकतो किंवा पक्षाच्या संकेतस्थळावरही तो दाखवला जाऊ शकतो. काँग्रेसने नमो टीव्हीमुळे समान संधी राहिलेली नाही अशी तक्रार केल्यानंतर निवडणूक आयोगाने दिल्लीच्या मुख्य निवडणूक अधिकाऱ्यांना या प्रकरणी अ हवाल देण्यास सांगितले होते. दिल्लीच्या मुख्य निवडणूक अधिकाऱ्यांनी नमो टीव्हीचे चिन्ह मंजूर केले असून त्यातील पंतप्रधान मोदी यांची जुनी भाषणे प्रमाणित केलेली नाहीत.