तब्बल सव्वा दोन महिन्यांच्या प्रतीक्षेनंतर राजनाथ सिंह यांच्या अध्यक्षतेखालील भाजपच्या नव्या राष्ट्रीय कार्यकारिणीची येत्या एक-दोन दिवसात घोषणा होण्याची शक्यता असून पक्षाच्या सर्वशक्तीमान संसदीय मंडळात गुजरातचे मुख्यमंत्री व पंतप्रधानपदाचे संभाव्य उमेदवार नरेंद्र मोदी यांचा समावेश तसेच राष्ट्रीय सरचिटणीसपदी वरूण गांधी व मोदी यांचे खंदे समर्थक अमित शाह यांची नियुक्ती निश्चित मानली जात आहे.
भाजपमधील विश्वसनीय सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार शनिवारी वा रविवारी या कार्यकारिणीची घोषणा होणार असून राष्ट्रीय सरचिटणीस पदासाठी जोरदार चुरस आहे. मोदी यांचे खास विश्वासू माजी गृह राज्यमंत्री अमित शाह, भाजपचे राष्ट्रीय सचिव व लोकसभेचे खासदार वरुण गांधी, गेल्या अनेक वर्षांंपासून पक्षाचे सरचिटणीस असलेले ज्येष्ठ नेते अनंतकुमार, विद्यमान राष्ट्रीय उपाध्यक्ष व राजनाथ सिंह यांचे विश्वासू मुख्तार अब्बास नकवी, विद्यमान सरचिटणीस थावरचंद गहलोत, झारखंडचे माजी मुख्यमंत्री अर्जुन मुंडा, विद्यमान राष्ट्रीय सरचिटणीस जगतप्रकाश नड्डा किंवा धर्मेंद्र प्रधान यांच्यापैकी एक,   बिहारमधून राधामोहन सिंह किंवा राजीवप्रताप रुडी यांच्यापैकी एक तसेच महिला सदस्य म्हणून विद्यमान सरचिटणीस किरण माहेश्वरी यांचा समावेश होण्याची शक्यता असल्याचे सूत्रांचे म्हणणे आहे. संघटन महामंत्रीपदी रामलाल कायम राहतील. राष्ट्रीय सरचिटणीसपदासाठी संघाचे आवडते मुरलीधर राव, अरुण जेटली यांच्या पसंतीच्या निर्मला सीतारामन यांच्याही नावाची सरचिटणीसपदासाठी चर्चा आहे. सीतारामन यांची सरचिटणीसपदी वर्णी न लागल्यास त्यांना पक्षाचे मुख्य प्रवक्तेपद सोपविले जाण्याची शक्यता आहे. राजनाथ सिंह यांचे राजकीय सचिव खासदार सुधांशू त्रिवेदी यांचीही पक्षप्रवक्तेपदी नियुक्ती होण्याची शक्यता आहे. प्रखर हिंदूुत्ववादी नेत्या उमा भारती यांची सरचिटणीसपदी नियुक्ती होण्याची शक्यता कमी असून त्यांना पक्षात उपाध्यक्षपद दिले जाईल, असे सूत्रांचे म्हणणे आहे. याशिवाय महिला मोर्चाच्या अध्यक्षपदी पुन्हा खासदार स्मृती इराणी, तर भाजयुमोच्या अध्यक्षपदी लोकसभेचे खासदार अनुराग ठाकूर यांची सलग दुसऱ्यांदा वर्णी लागण्याची चिन्हे आहेत. महाराष्ट्रातून पक्षाचे खजिनदारपदी खासदार पीयुष गोयल, राष्ट्रीय सचिवपदी किरीट सोमय्या वा पूनम महाजन यांची नियुक्ती होण्याची शक्यता आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा