राज्यसभेसाठी उमेदवारी अर्ज भरल्याने अमित शहा यांना केंद्रीय मंत्रीपदी संधी मिळणार असल्याची चर्चा जोरात असतानाच अमित शहा यांनी हे वृत्त फेटाळून लावले आहे. मंत्रीपदाचा प्रश्नच येत नाही, मी भाजपच्या राष्ट्रीय अध्यक्ष पदावर खूश असल्याचे अमित शहांनी स्पष्ट केले. देशाच्या संविधानात प्रत्येकाला न्यायालयात जाण्याचा अधिकार आहे. पण न्यायालय कायद्याच्या आधारेच निर्णय देते. अयोध्येतील राम मंदिराची उभारणी ही कोर्टाच्या निकालानुसार किंवा दोन्ही बाजूंशी चर्चा केल्यानंतरच होईल असे स्पष्टीकरण त्यांनी दिले.
उत्तर प्रदेश दौऱ्यावर असलेल्या भाजपाध्यक्ष अमित शहा यांनी सोमवारी पत्रकार परिषद घेतली. पनामा पेपरप्रकरणात केंद्र सरकारने कारवाई केली नाही अशी टीका विरोधक करत आहेत. यावर अमित शहा म्हणाले, पनामा प्रकरणात भाजपमधील कोणाचेही नाव नाही. सुप्रीम कोर्टाच्या आदेशानुसार याप्रकरणात विशेष तपास पथक स्थापन करण्यात आल्याचे त्यांनी सांगितले.
२०१४ ची लोकसभा निवडणूक आणि उत्तर प्रदेशमधील विधानसभा निवडणुकीत भाजपने राम मंदिरचा मुद्दा हाती घेतला होता. मग प्रत्यक्षात मंदिराचे काम कधी सुरु होणार असा प्रश्न त्यांना विचारण्यात आला. यावर अमित शहा म्हणाले, राम मंदिराची उभारणी सुप्रीम कोर्टाचा निर्णय किंवा संवादातूनच होईल. भाजपच्या भूमिकेत कोणताही बदल झालेला नाही असे त्यांनी स्पष्ट केले.
शिवपाल यादव भाजपत येणार असल्याची चर्चा उत्तर प्रदेशात रंगली आहे. पण सध्या तरी त्यांच्याशी पक्षप्रवेशाविषयी कोणतीही चर्चा झालेली नाही असे त्यांनी स्पष्ट केले. महाआघाडीत भाजपने फूट पाडलेली नाही. राजदच्या भ्रष्ट कारभाराला कंटाळून नितीशकुमार महाआघाडीतून बाहेर पडले असे त्यांनी सांगितले. केंद्रातील मोदी सरकार आणि राज्यात योगी सरकारने घेतलेल्या महत्त्वाच्या निर्णयाचा पाढाही त्यांनी वाचून दाखवला. गेल्या तीन वर्षात मोदी सरकारने ५० चांगली कामे केली. विरोधक अजूनही सरकारवर भ्रष्टाचाराचे आरोप करु शकलेले नाही असा दावा त्यांनी केला. मोदींनी जगभरात भारताला मानाचे स्थान मिळवून दिले आणि जागतिक नेता म्हणून स्वतःची ओळख निर्माण केली असे त्यांनी सांगितले.
उत्तर प्रदेशमधील कायदा आणि सुव्यवस्थेवरुन शहा म्हणाले, ज्या पोलीस खात्याला राजकारणाने पोखरले होते. ते खाते सुधारण्यासाठी काही वेळ लागेलच. गुजरातमधील आमदारांवर काँग्रेसचा विश्वास नाही का, म्हणूनच त्यांना बंगळुरुत लपवले असा टोलाही त्यांनी काँग्रेसला लगावला.