नवी दिल्ली : भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जे. पी. नड्डा यांनी सोमवारी राज्यसभेच्या सदस्यत्वाचा राजीनामा दिला. त्यामुळे त्यांना लोकसभा निवडणुकीच्या रिंगणात उतरवण्यात येण्याची शक्यता निर्माण झाली आहे.
संसदेच्या वरिष्ठ सभागृहामध्ये सलग दोन वेळा निवडून आलेले नड्डा हिमाचल प्रदेशमधून राज्यसभेचे सदस्य झाले होते. त्यांचा सहा वर्षांचा कार्यकाळ २ एप्रिल रोजी संपुष्टात येणार आहे. मात्र, त्यापूर्वीच नड्डा यांनी राजीनामा दिला असून राज्यसभेचे सभापती जगदीश धनखड यांनी तो तातडीने स्वीकारला.
नड्डा यांची राज्यसभेची मुदत संपत असल्यामुळे त्यांना भाजपने तिसऱ्यांदा गुजरातमधून राज्यसभेची उमेदवारी दिली होती व नड्डा बिनविरोध निवडूनही आले होते. त्यामुळे अश्विनी वैष्णव यांच्याप्रमाणे नड्डाही यावेळी लोकसभेची निवडणूक लढवणार नसल्याचे स्पष्ट झाले होते. मात्र, सोमवारी अचानक नड्डा यांनी राज्यसभेच्या सदस्यत्वाचा राजीनामा देऊन २०२४च्या लोकसभा निवडणुकीत उतरण्याचा निर्णय घेतला.
हेही वाचा >>>भारतीयांचा तंबाखूजन्य पदार्थांवरील खर्च वाढला, शिक्षणावरील खर्चात घट!
राज्यसभेचे सलग दोन वेळा सदस्य झालेल्या बहुतांश नेते व केंद्रीय मंत्र्यांना भाजपने लोकसभेची निवडणूक लढवण्यास सांगितले आहे. भाजपने जाहीर केलेल्या १९५ उमेदवारांमध्ये केंद्रीयमंत्री भूपेंदर यादव, मनसुख मंडाविया, पुरुषोत्तम रुपाला, राजीव चंद्रशेखर आदी राज्यसभा सदस्यांचा समावेश करण्यात आला आहे. केंद्रीय मंत्री पीयुष गोयल, निर्मला सीतारामन, एस. जयशंकर यांना देखील लोकसभेची उमेदवारी दिली जाण्याची शक्यता आहे. नड्डा यांनी राजीनामा दिल्यामुळे राज्यसभेचे सदस्य असलेल्या भाजपच्या आणखी एका वरिष्ठ नेत्याला लोकसभेचा निवडणुकीच्या रिंगणात उतरवले जाण्याची शक्यता आहे. नड्डा यांना उमेदवारी दिली तर त्यांची ही पहिलीच लोकसभा निवडणूक असेल.