भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष राजनाथ सिंह यांनी आज अमेरिकेच्या भारतातील राजदूत नॅन्सी जे. पॉवेल यांच्याशी विविध मुद्यांवर दीर्घकाळ चर्चा केली. पण भाजपचे पंतप्रधानपदाचे संभाव्य उमेदवार व गुजरातचे मुख्यमंत्री नरेंद्र मोदी यांच्या अमेरिकन व्हिसाच्या मुद्याचा मात्र त्यात समावेश नसल्याचे समजते.
नॅन्सी पॉवेल यांनी आज राजनाथ सिंह यांची त्यांच्या निवासस्थानी भेट घेऊन सुमारे सव्वातास चर्चा केली. उभय देशांदरम्यानच्या द्विपक्षीय संबंधांवरच या चर्चेचा रोख केंद्रीत झाला होता. भारत-अमेरिकेदरम्यान परस्पर सहकार्य वृद्धिंगत करणे, दक्षिण आशियातील सुरक्षेची स्थिती, दहशतवाद, व्यापार आणि तंत्रज्ञानातील भागीदारी आदी मुद्यांवर पॉवेल यांच्याशी राजनाथ सिंह यांनी त्यांचे राजकीय सल्लागार सुधांशू त्रिवेदी, विजय जॉली तसेच ए. सुकेश आणि चॅड थॉर्नबेरी यांच्यासह संवाद साधला. २०१४ पासून अफगाणिस्तानमधून नाटो फौजांच्या माघारीमुळे उद्भवणाऱ्या स्थितीवर राजनाथ सिंह यांनी चिंता व्यक्त केली तसेच किरकोळ क्षेत्रातील विदेशी गुंतवणुकीच्या मुद्यावरही त्यांनी पॉवेल यांच्याशी चर्चा केली. पण अमेरिकेने मोदींच्या अडवलेल्या व्हिसाचा मुद्दा या चर्चेत उपस्थित झाला नसल्याचे विश्वसनीय सूत्रांनी सांगितले. या बैठकीत अनेक मुद्यांवर चर्चा झाली, पण काही गोष्टी सांगायच्या नसतात, असे राजनाथ सिंह यांचे राजकीय सल्लागार त्रिवेदी यांनी पत्रकारांना सांगितले. मात्र, मोदींच्या व्हिसाचा ज्वलंत मुद्दा या चर्चेत उपस्थित कसा झाला नाही, याविषयी भाजप वर्तुळात आश्चर्य व्यक्त केले जात होते.